शहरातील मतदारांना १५ हजार रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये
हळवल फाट्यातील बॅनर ठरतोय जिल्ह्यात चर्चेचा विषय
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवलीजवळील हळवल फाटा परिसरात झळकलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वर्दळीच्या हळवल फाटा परिसरात आज हा बॅनर लक्ष वेधून घेत असून, त्यातील मजकुरामुळे जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे.
समान मत, समान किंमत… शहरातील मतदारांना १५ हजार रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये,” असा थेट, आक्रमक आणि आरोपात्मक मजकूर या बॅनरवर झळकला आहे. या मजकुरातून ग्रामीण मतदारांवर होत असलेल्या कथित भेदभावाकडे लक्ष वेधण्यात आले असून, अप्रत्यक्षपणे मतदार खरेदीचे गंभीर आरोप उपस्थित करण्यात आले आहेत. निवडणूक काळात अशा स्वरूपाचा बॅनर सार्वजनिक ठिकाणी लागल्याने राजकीय वर्तुळात खसखस निर्माण झाली आहे. बॅनर कोणी लावला, यामागे कोणता पक्ष किंवा गट आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी या मजकुरामुळे निवडणूक प्रचाराला वेगळे वळण मिळाल्याचे चित्र आहे. ग्रामीण व शहरी मतदारांमधील असमानतेचा मुद्दा ऐरणीवर आणत हा बॅनर सामाजिक आणि राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. दरम्यान, या प्रकरणावर निवडणूक यंत्रणा किंवा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Subscribe







