दोषींवर कारवाई होऊन नळ जोडणीची परवानगी मिळावी
अन्यथा २६ जानेवारीला आचारसंहिता असूनही उपोषणाला बसणार
आंबोली येथील रहिवासी दत्ताराम कर्पे यांचे सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन
सावंतवाडी : स्वतःच्या मालकीची इमारत असताना काही जणांकडून पिण्याच्या पाण्याच्या कनेक्शनसाठी अटकाव होत असून अटकाव करणाऱ्या संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी तसेच घरामध्ये नळ जोडणीची परवानगी मिळावी. अन्यथा येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आचारसंहिता असूनही उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आंबोली येथील रहिवासी दत्ताराम रामचंद्र कर्पे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार सावंतवाडी यांच्याकडे सुपूर्त केले आहे.
या निवेदनात नमूद केलेल्या माहितीनुसार आंबोली बाजारवाडी येथील रहिवासी दत्ताराम रामचंद्र कर्पे यांची ग्रामपंचायत हद्दीत इमारत असून या इमारतीमध्ये वीज कनेक्शन घेतले आहे. परंतु सदर इमारतीच्या विजेची वायर कोणीतरी वारंवार तोडत आहे. शिवाय या इमारतीत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने कर्पे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून पाण्याचे कनेक्शन मंजूर करून घेतले होते. त्याप्रमाणे १६ जानेवारी रोजी जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी नळ जोडणीसाठी आले असता संबंधित जाधव कुटुंबीयांनी ताकदीच्या जोरावर दमदाटी करत नळ कनेक्शन जोडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यास अटकाव केला. तसेच पुन्हा नळ कनेक्शन केल्यास ते तोडून टाकण्याची धमकी दिली.कर्पे यांचा नेहमी येण्याजण्याचा ग्रामपंचायत रस्ता जाधव यांच्या घराच्या बाजूला असून या रस्त्याने जाता – येता जाधव कुटुंबीय जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच यापूर्वी देखील डोक्यावर काचेची बॉटल मारून दुखापत केल्याचे कर्पे यांनी म्हटले आहे.
संबंधित जाधव कुटुंबीयांमुळे आपल्याला मनस्ताप सहन करावा लागत असून दोषींवर योग्य ती कारवाई करावी. तसेच आपल्याला नळ जोडणीसाठी परवानगी मिळावी अन्यथा दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आचारसंहिता असूनही नाईलाजास्तव उपोषणाला बसावे लागेल असा इशारा अर्जदार दत्ताराम रामचंद्र कर्पे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Subscribe









