सावंतवाडीत १६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

हुशार खेळाडूने जीवन संपवल्याने हळहळ

सावंतवाडी : शहरातील जुनाबाजार कामत नगर परिसरात एका १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जतिन उर्फ जय प्रशांत राऊळ (वय १६) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. जतिन हा अभ्यासात हुशार असण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर होता, त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे गूढ कायम आहे.

नेमकी घटना काय?

मूळचे नेमळे-फौजदारवाडी येथील असलेले राऊळ कुटुंब सध्या सावंतवाडी शहरात वास्तव्यास आहे. कामत नगर येथील ज्या इमारतीत ते पूर्वी राहत होते, ती इमारत सध्या रिडेव्हलपमेंटसाठी रिकामी करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जतिन घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना कामत नगर येथील त्यांचे जुने घर (खोली) बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता, जतिनने मागील दरवाजाने आत प्रवेश करून गळफास घेतल्याचे दिसून आले.

पोलिस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जतिनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. जतिन हा स्वभावाने अत्यंत चांगला आणि खेळातही निपुण होता, अशा गुणवान विद्यार्थ्याने अचानक केलेल्या आत्महत्येमुळे राऊळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, जतिनच्या अशा जाण्याने संपूर्ण सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!