मालवण हादरले! दांडी किनाऱ्यावर पर्यटकांसमोरच रक्ताचा सडा

स्कुबा डायव्हिंग बोटीवरून येताच तरुणावर बियरच्या बाटलीने हल्ला;

दोघे गंभीर जखमी.

मालवण : मालवण येथील दांडी किनाऱ्यावर शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुन्या वादातून काही युवकांनी पर्यटकांच्या देखतच एका तरुणावर बियरची बाटली आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात नितीन द्वारकानाथ तोडणकर आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेले राजेंद्र कांदळगावकर हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन तोडणकर हे स्कुबा डायव्हिंगच्या बोटीतून पर्यटकांना घेऊन किनाऱ्यावर परतत असताना, तिथे दबा धरून बसलेल्या संशयित युवकांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. संशयितांनी नितीन यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडली, ज्यामुळे त्यांच्या हाताला, डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी धावलेले राजेंद्र कांदळगावकर यांच्यावरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या मारहाणीत सचिन आडकर नावाच्या व्यक्तीलाही मारहाण झाली आहे.

रुग्णालयात उपचार आणि पोलीस कारवाई

जखमींना तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे दांडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पर्यटकांमध्येही घबराट पसरली आहे.
शुक्रवारी उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. स्थानिक नगरसेवक महेश कोयंडे, सौ. अन्वेषा आचरेकर आणि सौ. पूनम चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली.

व्यावसायिकांची संतप्त प्रतिक्रिया

पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. “हा हल्ला पूर्वनियोजित कट रचून जिवे ठार मारण्याच्या उद्देशानेच करण्यात आला आहे. पर्यटन व्यवसाय करत असताना अशा प्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी आहे. पोलिसांनी संशयित आरोपींना तत्काळ अटक करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नव्हती. मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!