सावंतवाडीचा उपनगराध्यक्ष कोण?
पालकमंत्र्यांच्या दौऱ्याने वाढली धडधड
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडीवरून स्थानिक राजकारणात मोठा पेच निर्माण झाला असून ‘कोण ठरणार वरचढ?’ याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपमध्ये ११ नगरसेवकांचे संख्याबळ असूनही अंतर्गत मतभेदांमुळे निवडीत अचानक ‘ट्विस्ट’ आला आहे. भाजपमधून ॲड. अनिल निरवडेकर, आनंद नेवगी आणि सुधीर आडीवडेकर यांची नावे चर्चेत असतानाच, युती झाल्यास संजू परब यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. मात्र, भाजपमधील या परस्पर विरोधी गटांनी आपापल्या उमेदवारासाठी मोठी फिल्डिंग लावली असून पेच अधिकच वाढला आहे.
दुसरीकडे, शिवसेनेने ७ नगरसेवकांच्या जोरावर आपला उमेदवार रिंगणात उतरवत अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि उबाठा सेनेचा प्रत्येकी १-१ नगरसेवक असून, जर गुप्त मतदानाची वेळ आली तर ही दोन मते अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. भाजपमधील फुटीचा फायदा उठवण्यासाठी विरोधकांनीही आपली रणनीती आखली आहे, ज्यामुळे निवडणुकीतील रंगत अधिकच वाढली असून सस्पेन्स शिगेला पोहोचला आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे आज जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ते कार्यकर्त्यांचा आढावा घेणार असले तरी, सावंतवाडी उपनगराध्यक्षपदाचा तिढा सोडवणे हे त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असेल. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होणार आणि सावंतवाडीचा नवा उपनगराध्यक्ष कोण ठरणार, याचा फैसला आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे.


Subscribe









