• ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे १७ ते २४ डिसेंबर पर्यंत पिकांची नोंद करावी
• ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे करणार स्थळ पाहणी
सिंधुदुर्गनगरी : राज्यात खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणेबाबत दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे. तसेच खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पहाणी करणेबाबत मंडळ अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम २०२५ मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दिनांक १७ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ पर्यंत पिकांची नोंद करणेकरिता अर्ज सादर करावेत. तसेच संबंधित शेतकरी यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दाखल केलेल्या अर्जाची पोहोच घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी ही दिनांक २५ डिसेंबर २०२५ ते ०७ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये करतील व सदर स्थळपाहणी करण्यापुर्वी समितीमार्फत स्थळपाहणीची दिनांक व वेळ निश्चित करून त्याची पूर्व कल्पना संबंधित शेतकऱ्यास, शेताच्या बांधाला लागून असलेल्या किमान ४-५ शेतकऱ्यांना लेखी स्वरुपात देण्यात येईल. प्रत्यक्ष स्थळपाहणीच्या दिवशी खरीप हंगाम २०२५ मध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची लागवड केली होती त्याची स्थानिक चौकशी करून पीक नोंदणीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती दर्शक पंचनामा करावा व शेताच्या बांधाला लागून असलेले इतर शेतकऱ्यांचे जाब जबाब नोंदविण्यात येतील. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी गाव नमुना नं १२ वर यापुर्वी प्रतिबिंबित झालेली नाही त्या शेतकऱ्यासंदर्भात वरील प्रक्रिया अवलंबविणेची आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करणेत येते कि, ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम २०२५ मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दिनांक १७ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ पर्यंत पिकांची नोंद करणेकरिता अर्ज सादर करावेत असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी केले आहे.



Subscribe






