कुडाळ: प्रतिनिधी
वेताळ बांबर्डे गावातील मुख्य रस्त्याची अखेर आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डागडुजी सुरू करण्यात आली आहे. वेताळ बांबर्डे ते नारुर हा रस्ता खड्डेमय बनल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. तसेच या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने चालकांना कसरत करावी लागते. दरम्यान, आजपासून वेताळ बांबर्डे तिठा येथून खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या दूरवस्थेबाबत ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या रस्ता खड्डेमय होऊन अपघातास कारणीभूत ठरला होता. यासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यावेळी रस्त्याची डागडुजी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी या रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या कामाची पाहणी सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच शैलेश घाटकर, प्रदीप गावडे, दशरथ कदम, साजूराम नाईक, समृद्धी कदम, सृष्टी सावंत, रश्मी तिवरेकर, भाजप शक्तीकेंद्रप्रमुख अरविंद बांबर्डेकर, संतोष कदम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



Subscribe






