मालवण : कराराने घेतलेल्या आंबा बागेत फवारणी करताना सुमारे तीस फूट उंचीवरून खाली कोसळल्याने भरड येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज (वय ४५, रा. भरड–मालवण) असे मृताचे नाव आहे.
अँड्र्यू कार्डोज हे भाऊ लुईस फ्रान्सिस कार्डोज (वय ४२) यांच्यासोबत आचरा-भंडारवाडी येथील आंबा कलम बागेत फवारणीसाठी आले होते. लुईस कार्डोज हे गेल्या दहा वर्षांपासून आंबा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असून संबंधित आंबा बाग त्यांनी कराराने घेतली आहे. आज पत्नी, भाऊ आणि कामगारांसह ते फवारणीचे काम करत होते.
फवारणीसाठी अँड्र्यू कार्डोज हे उंच डेरेदार आंबा कलमावर चढले होते. काम पूर्ण करून ते दोरीच्या साहाय्याने खाली उतरत असताना अचानक हातातील दोरी सुटली. त्यामुळे ते थेट तीस फूट उंचीवरून झाडाखालील दगड-धोंड्यांमध्ये कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकाराची माहिती लुईस फ्रान्सिस कार्डोज यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास आचरा पोलिसांतर्फे सुरू आहे.