शेतीचे मोठे नुकसान
पालकमंत्री नितेश राणे यांचे तात्काळ पंचनाम्याचे निर्देश
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. या गंभीर नैसर्गिक संकटाची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
ट्विटद्वारे माहिती
पालकमंत्री नितेश राणे यांनी आज (सोमवारी) रात्री उशिरा ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत मी जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासन मदत करेल, याची ग्वाही देतो!”
शेतकऱ्यांना दिलासा
अवकाळी पावसामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतीत मोठे नुकसान झाले आहे, विशेषतः भातशेतीला मोठा फटका बसला असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्र्यांनी त्वरित पंचनाम्याचे आदेश दिल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आलेल्या निर्देशानुसार, पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त होताच, शासनाकडून नुकसानभरपाईची प्रक्रिया वेगाने सुरू होईल आणि बाधित शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. पालकमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे जिल्हा प्रशासनही आता ‘ॲक्शन मोड’वर आले असून पंचनाम्याच्या कामाला गती मिळणार आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









