तोंडवली – कुडतरकरवाडी येथे खळबळ
कणकवली: कणकवली तालुक्यातील तोंडवली – कुडतरकरवाडी येथे अत्यंत दुःखद घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले सुरेश गणपत नर (६१) हे बुधवारी रात्री उशिरा कुडतरकरवाडी येथील आपल्याच बागेतील विहिरीत मृतावस्थेत आढळून आले. ते विहिरीत कसे पडले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
शोधकार्य व घटनाक्रम
सुरेश नर हे बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कुडतरकरवाडी येथील त्यांच्या बागेमध्ये कामासाठी गेले होते. रात्री दहा वाजेपर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांची चौकशी सुरू केली. कुडतरकरवाडी येथील प्रल्हाद कुडतरकर यांनी गावचे पोलीस पाटील विजय मोरये यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर कुडतरकर, मोरये आणि ग्रामस्थांनी मिळून सुरेश नर हे काम करत असलेल्या बागेमध्ये त्यांचा शोध घेतला. शोध घेत असताना विहिरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना सुरेश नर यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसला.
अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर
विहीर खूप खोल असल्यामुळे मृतदेह बाहेर काढणे ग्रामस्थांना शक्य होत नव्हते. त्यामुळे तात्काळ अग्निशमन केंद्र कुडाळ यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
या घटनेने तोंडवली – कुडतरकरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस पाटील विजय मोरये यांनी दिलेल्या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.














 
	

 Subscribe
Subscribe









