वृद्धाचा मृत्यू
रस्ता ओलांडताना बसली एस. टी. ची धडक
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी गणेश मंदिर येथे एसटीची धडक बसून पांडुरंग नारायण घाटवळ (वय ७५, रा. निवती, ता. वेंगुर्ला) हे वृद्ध गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलवण्यात येत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. हा अपघात दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. हा अपघात रस्ता ओलांडून एसटी पकडण्यासाठी येत असताना घडला.
यातील पांडुरंग घाटवळ पिंगुळी येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. जेवण झाल्यानंतर त्यांना बांदा येथे जायचे होते. जेवण झाल्यानंतर ते रस्ता ओलांडून बस स्टॉपच्या दिशेने येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या व सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसची घाटवळ यांना समोरून धडक बसली. यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील घाटवळ यांना त्वरित कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना त्वरित ओरोस जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आले. या दरम्यान वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
घाटवळ यांनी आपल्याला बांदा येथे जायचे असल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शिना सांगितले होते. समोरून एसटी बस येत असल्याचे दिसल्याने ती पकडण्यासाठी ते जात असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. मात्र, याच दरम्यान त्यांचा महामार्गावरून जाणाऱ्या एसटी बसची जोरदार धडक बसली. महामार्गावरून जाणारी एसटी बस त्यांना प्रवासी बस असल्याचे वाटल्याने ती पकडण्यासाठी ते लगबगीने जात होते. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. परंतु, ही एसटी बस प्रवासी नसून झाराप येथील सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी जात होती. ही एसटी बसचालक नागेश एकनाथ पाटील (रा. कोल्हापूर) हे चालवत होते. मात्र, त्यांना याबाबत कोणतीच कल्पना नव्हती. या स्थितीत त्यांचा गोंधळले असतील व त्यांची गाडीला धडक बसली असावी असे घटनास्थळावरून सांगण्यात आले. एसटीच्या डाव्या बाजूच्या चाकाला त्यांची ठोकर बसली. यात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. याबाबत पुढील कार्यवाही कुडाळ पोलीस स्टेशन येथे उशिरापर्यंत चालू होती.
















 
	

 Subscribe
Subscribe









