सावंतवाडी येथील विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात

सर्व प्रकारानंतर त्याच अवस्थेत महिलेला माहेरी आणून सोडले

दोन नणंदानी घडवून आणला गर्भपात.

सावंतवाडी : विवाहितेच्या मनाविरोधात तिच्या दोन नणंदानी चार महिन्याच्या बाळाचा गर्भपात केल्याचा प्रकार सावंतवाडीत घडला आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारानंतर त्या महिलेला त्याच अवस्थेत माहेरच्या दारात आणून सोडण्यात आले. या प्रकाराबाबत तिच्या भावाने जोरदार आक्षेप घेतला असून आपल्याला या प्रकाराची तक्रार करायची आहे आणि आपल्या बहिणीला न्याय द्यायचा आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबतची माहिती त्यांनी ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांना दिली. त्यानंतर त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्यांना जाण्याच्या सूचना केल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे. याबाबत संबंधित विवाहितेच्या भावाने ही माहिती दिली त्याच्या म्हणण्यानुसार, आपल्या बहिणीचे आपण पंधरा वर्षांपूर्वी बेळगाव येथे लग्न करून दिले होते. दरम्यानच्या काळात त्या दोघांना मुल नव्हते. चार महिन्यांपूर्वी ती गर्भवती राहिली. मात्र हिमोग्लोबिन कमी असल्याचे कारण सांगून सावंतवाडीतील एका डॉक्टरने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याच्या सूचना केल्या. मात्र संबंधितांनी त्या ठिकाणी न जाता सावंतवाडी शहरातील एका खाजगी दवाखान्यात जाऊन त्या मुलाचा गर्भपात केला. तसेच हा प्रकार झाल्यानंतर त्याच अवस्थेत त्या महिलेला आणून माहेरच्या दारात आणून सोडले. या सर्व प्रकाराने ती कावरी-बावरी झाली. आपल्याला गर्भपात करायचा नव्हता. मात्र दोन नणंदानी आपल्याला कोणतीही कल्पना न देता जबरदस्तीने हा प्रकार करून घेतला. आपला पती काही बोलला नाही, असे तिचे म्हणणे आहे.

झालेला प्रकार तिने आपल्या भावाला सांगितला. त्या भावानेही या प्रकाराच्या विरोधात गंभीर दखल घेतली असून आपण पोलिसात तक्रार करणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

त्यानुसार त्यांनी ही माहिती श्री. सुभेदार यांना दिली. याबाबत चर्चा झाल्यानंतर सुभेदार यांनी त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या बहिणीला गर्भपात करायचा नव्हता तरीही दोन नंदानी जबरदस्तीने हा प्रकार करायला लागला आणि उलट आपल्या बहिणीला वाटेला आणून सोडले. हा सर्व प्रकार संबंधित डॉक्टरने विवाह प्रमाणपत्र मागितल्यानंतर पुढे आला. त्यामुळे आपल्या बहिणीला न्याय द्यावा, असे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. त्यानुसार आता पोलीस पुढील नेमकी काय भूमिका घेतात? याकडे लक्ष आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आत्ताच हे प्रकरण माझ्या समोर आले आहे. मात्र नेमका प्रकार काय?, याबाबत संबधित डॉक्टरांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत. आईच्या परवानगीशिवाय असा प्रकार डॉक्टर किंवा अन्य कोणाकडून होऊ शकत नाही तरीही संबंधताची तक्रार लक्षात घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महिला अधिकाऱ्यांकडे दिले आहे. लवकरच याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.

error: Content is protected !!