झाराप येथे घडलेल्या दुर्दैवी अपघातानंतर स्थानिक जनतेचा उद्रेक झाला. उडवाउडवीची आणि बेजबाबदार उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना स्थानिकांची बाचाबाची झाली. यातून संतप्त झालेले माजी आमदार वैभव नाईक यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करून त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणावरून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्याचा हा प्रकार आहे. कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई गोवा महामार्गावर होत असलेल्या अक्षम्य गैरप्रकारांच्या विरोधात शिवसेना आवाज उठवतच राहणार आहे.
मुंबई गोवा महामार्ग हा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यावर सातत्याने होणारी दुरुस्ती आणि ती दुरुस्ती करताना माहितीफलक लावण्यात हलगर्जीपणा यामुळे या मार्गावर अनेक बळी गेले आहेत. यात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. आणि यासाठी ठेकेदाराबरोबरच स्थानिक प्रशासन जबाबदार आहे. पोटचा गोळा गमावलेल्या कुटुंबाना त्यांच्या पोराबाळांचे जीव प्रशासन आणि सरकार परत आणून देणार आहे काय ?
माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर झालेली कारवाई केवळ सूडभावनेतून झालेली आहे. तक्रार दाखल करणारे अधिकारी कोणत्या जातीचे आहेत, हे नाईक यांना माहिती असण्याची कोणतीही शक्यता नाही. मात्र तरीही स्वतःची कायदे वाचवण्यासाठी कायद्याचा आधार घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणारे अपघात जातपात पाहत नाहीत. कोणत्याही जातीचा, गरीब – श्रीमंतांचा पोटचा गोळा यात बाली पडू शकतो, हे संबंधितांनी नीट लक्षात ठेवावे.
आजपर्यंत या महामार्गावर अनेक बळी गेले. अनेकांच्या चिंता अजून विझल्याही नाहीत. कित्येकजण या महामार्गावर जन्माचे जायबंदी झाले. पण किती अधिकाऱ्यांवर कारवाई झाली ? दुर्लक्ष करणाऱ्या किती अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले ? आता कायद्याच्या भीतीने लोकप्रतिनिधींनी अन्यायाला वाचा फोडायचीच नाही का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गंभीर घटनेत देखील अधिकारी उडवाउडवी करीत असतील तर सामान्य माणसाने फक्त धडाडत असलेल्या चिता पाहत शांत बसायचे का? प्रशासन यांना या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावीच लागतील.
शिवसेनेने कधीही जातपात पाहिलेली नाही. संकटात धावून जाणारी आणि अन्यायाच्या विरोधात जातपात न पाहता थोबाड फोडणारी संघटना म्हणजे शिवसेना आहे. अन्याय होत असेल तर जातपात न पाहता आणि कुणाचाही दर्जा न पाहता शिवसेनेचा चाबूक बसणारच आहे, हे सर्वानी नीट लक्षात ठेवावे. आम्ही कालही जनतेसोबत होतो, आजही जनतेसोबत आहोत आणि उद्याही जनतेसोबतच राहणार आहोत. जनतेला आणि शिवसेनेला कुणीही गृहीत धरू नये, आणि शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नये. संपूर्ण जिल्ह्याची शिवसेना वैभव नाईक यांच्या ठामपणे उभी आहे.


Subscribe










