दिशा बागवे खून प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे हाती

नायलॉनच्या दोरीने गळा आवळून करण्यात आला खून

वाडोस येथील ओहोळात फेकला होता मोबाईल

झुडपातील लाकडाच्या ढिगाऱ्याखाली लपवले होते दप्तर

कुडाळ : बेपत्ता अल्पवयीन विद्यार्थिनी दिशा तिमाजी बागवे खून प्रकरणी कुडाळ पोलिसांच्या हाती दोन दिवसात बरेच पुरावे हाती लागले आहेत. कुडाळ पोलीस या प्रकरणी कसून तपास करीत असून गुरुवारी दिशाची कॉलेजची सॅक आणि ज्या दोरीने तिचा गळा आवळून जीव घेण्यात आला ती नायलॉन दोरी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर आज पोलिसांना दिशाचा मोबाईल सापडून आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात संशयीत आरोपी कुणाल कुंभार याने गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच-०७-एक्यू-६०४०) हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्राथमिक तपासात प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याची दाट शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली.
कुडाळ तालुक्यातील घावनळे- वायंगणीवाडी येथील २ ऑगस्ट २०२५ पासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय दिशा तिमाजी बागवे हिचा एका युवकाने वाडोस बाटमाचा चाळा येथून शंभर मीटर अंतरावर निर्जन स्थळी खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली होती. या घटनेने माणगाव खोऱ्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी कुणाल कृष्णा कुंभार( वय 22 राहणार गोठोस मांडशेतवाडी तालुका कुडाळ) याला अटक केली होती. पोलिसांनी त्याला आपला हिसका दाखवल्यानंतर त्याने खून केलेले ठिकाण आणि दिशा हिचा बंद मांगरवजाघरात टाकलेला मृतदेह पोलिसांना दाखवला. दरम्यान कुणाल कुंभार या संशयीताला पोलिसांनी अटक करून कुडाळ न्यायालयासमोर जर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
या दरम्यान पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली असून पुन्हा घटनास्थळी गुरुवारी भेट दिली असता त्या ठिकाणी कुणाल कुंभार याने ज्या दोरीने दिशा हिचा गळा आवळून जीव घेतला ती नायलॉनची दोरी त्याच मांगरवजा घरात सापडली. त्याचबरोबर दीपा हिचे कॉलेजचे दप्तर घरापासून काही अंतरावर एका झुडपांमध्ये लाकडाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलेले सापडले. त्या दप्तरामध्ये तिच्या शैक्षणिक साहित्यसह इतर अनेक वस्तू सापडल्या. त्यामध्ये तिचे कॉलेजचे आयकार्ड, हिरवी मूठ असलेली छत्री, सॅनिटरी पॅड, तसेच तिचे काही पासपोर्ट फोटो आणि रोख १८००/- रुपयेची रोकड आदी साहित्य तिच्या बॅगेत सापडून आले.
तसेच पोलिसांनी आज शुक्रवारी देखील घटनास्थळी भेट दिली. वाडोस देऊळवाडी येथील एका ओहोळात दिशा हीच रियलमी कंपनीचा मोबाईल आढळून आला. त्याचबरोबर दिशा हिच्या गळ्यातली सोन्याची चैन संशयित आरोपीने ज्या ठिकाणी फेकली होती त्या ठिकाणी बॉम्बशोध पथकाच्या साहाय्याने शोध घेण्यात आला. पण दलदलीची शेत जमीन असल्याने ती चैन मात्र आढळून आली नाही.

प्रेम प्रकरणातूनच दिशाला संपवले ?

दरम्यान संशयित कुणाल कुंभार यांने प्रेम प्रकरणातूनच दिशाला संपविल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत. दिशा आणि कुणाल याचे एकमेकांवर प्रेम होते. पण दिशा हिने आपल्याला करियरवर फोकस करायचे आहे, त्यामुळे आपण फक्त मैत्री ठेवू असे कुणालला सांगितले. पण कुणालला संशय आला होता. त्याने तिच्यावर पाळत ठेवली त्यावेळी तिचे अन्य कोणासोबत प्रेम संबंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. आणि त्याने दिशाला संपविण्याचा प्लॅन केला.
१ ऑगस्टच्या रात्री दोघेजण सुमारे ४० मिनिट फोनवर बोलली. पुन्हा २ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला ती दोघे फोनवर बोलली. त्याने तिला आंबेरी तिठा येथे स्टॉपवर येण्यास सांगितले. ती कॉलेजला जाण्यासाठी स्टॉपवर आल्यावर तो तिला मोटार सायकलवरून वाडोस-बाटमाचा चाळा येथून शंभर मीटर अंतरावर असलेल्या डॉ. शरद पाटील यांच्या मांगरवजा घराजवळ घेऊन गेला. दिशा मोबाइल चाळत असताना त्याने पाठीमागून तिच्या गळ्यात नायलॉन दोरी टाकून तिचा त्या दोरीने गळा आवळून खून केला.

कोल्हापूर फॉरेन्सिक विभाग घटनास्थळाची पाहणी करणार

दरम्यान दिशा हीचा मृतदेह शवविच्छेदनसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पण अजून शविच्छेदांचा अहवाल त्यांनी दिलेला नाही. दिशांचे हृदय वगैरे भाग त्यांनी राखून ठेवले आहेत. तसेच कोल्हापूर फॉरेन्सिक विभागाची टीम घटनास्थळी भेट देण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले. दरम्यान दिशा हिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता का याबाबत माहिती विचारली असता, ५८ दिवस झाल्याने मृतदेह सडला होता त्यामुळे तसे सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
error: Content is protected !!