बांदा येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई

साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा : येथील पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ लाख ५० हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यात दारूचे बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो यांचा समावेश आहे. या प्रकरणी तिघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री साडेआठच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी इन्सुली तपासणी नाक्यावर सापळा रचला. यावेळी, गोवा येथून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एका टेम्पोची तपासणी केली असता, त्यात विविध बँडच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. यात व्हिस्की, व्होडका आणि रम यांसारख्या विविध प्रकारच्या दारूचा समावेश होता. पोलिसांनी टेम्पोचालक युवराज दिलीप कुरणे (वय ३९), अर्जुन राजेंद्र साळोखे (वय २९) (दोघेही रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) आणि सुशांत महाले (रा. तोरसे, गोवा) या तिघांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, परवाना नसताना ही दारू बेकायदेशीरपणे गोवा येथून कोल्हापूरला नेली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी दारूचा साठा आणि टेम्पो मिळून एकूण ५,५०,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विलास पांडुरंग भोगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहा. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, सहा. पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, एएसआय दासू पवार, एएसआय पालकर, कॉन्स्टेबल प्रसाद पाटील आणि पोलीस नाईक विलास भोगले यांचा सहभाग होता.

error: Content is protected !!