बांदा : कोनशी-भटवाडी येथील युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईशा बाळकृष्ण केसरकर (वय २२) असे तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता ईशा आपल्या खोलीत गेली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली नाही. कुटुंबीयांनी तिला आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला. दरवाजा उघडल्यानंतर ईशा खोलीतील लोखंडी खांबाला नायलॉनच्या साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
या घटनेची माहिती तात्काळ बांदा पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, पोलिस कर्मचारी श्री. कोळेकर, हेडकॉन्स्टेबल रामचंद्र तेली आणि महिला पोलिस निकिता आळवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाचे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी बांदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.