२३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पालकमंत्री नितेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची धडक कारवाई
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषदेत इशारा दिल्यानंतर कणकवली पोलीस अलर्ट मोडवर आले असून साकेडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हापसेकर हिच्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्यावर पोलिसांनी आज शनिवारी दुपारी छापा मारत गोवा बनावटीची दारू, गावठी दारू व गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 23 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर पंधरा हजार रुपयांचे कुजलेले रसायन नष्ट करण्यात आले. कणकवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी बितोज जुवाव म्हापसेकर (72) या महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय काशीद यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हटले आहे, साकेडी बोरीची वाडी या ठिकाणी बितोज जुवाव म्हापसेकर ही गावठी हातभट्टीची दारू व गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांना याबाबतची कल्पना देत पोलीस पथकाने घटनास्थळी शनिवारी दुपारी धाड टाकली. यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पांडुरंग पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे हे या कारवाई मध्ये सहभागी झाले होते. यावेळी बितोज जुवाव म्हापसेकर हिच्या घराच्या पडवीत गोवा बनावटीची दारू व गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. यामध्ये 1250 रुपयांची 180 मिली च्या 25 बाटल्या, तसेच 1200 रुपयाच्या लेमन होडका मिली च्या 24 बाटल्या, 600 रुपयांच्या गावठी दारूच्या एक लिटरच्या 2 बाटल्या व 150 रुपयांच्या 180 मिली च्या पाच बाटल्या. तसेच गावठी दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे 2500 रुपये किमतीचे गाडगे, 1000 रुपये किमतीचे पातेले, 2000 रुपये किमतीचा लाकडी चाटु, स्टीलचा पत्रा व स्टील नळी व नवसागरच्या पाच वड्या, हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर 12500 किमतीचे गुळ व नवसागर मिश्रित 250 लिटर कुजलेले रसायन व दुसऱ्या ड्रम मध्ये गुळ व नवसागर मिश्रित कुजलेले रसायन असा सर्व मिळून एकूण 23 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच गावठी दारू करिता जंगल मय भागात घरा नजीकच ठेवलेले कुजलेल्या स्थितीतले रसायन पंचांसमक्ष ओतून नष्ट केले. याप्रकरणी संशयित आरोपी बितोज जुवाव म्हापसेकर हिच्यावर मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई), (ब), (ड), (फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी कालच अवैध धंद्यांबाबत इशारा दिला होता. त्यानंतर कणकवली पोलीस अलर्ट मोडवर आले असून, गेले अनेक वर्ष चालू असलेला गावठी हातभट्टीचा हा दारूअड्डा पोलिसांनी नष्ट केला.













