अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री ऍक्शन मोडवर


” थेट पालकमंत्र्यांनी धाड टाकल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

ऑनलाईन मटका जुगाराचा ही केला भांडाफोड

२.७३ लाखांची रोकड व संगणक साहित्य जप्त

महादेव घेवारीसह १२ जणांना अटक

पोलिसांवर पालकमंत्र्यांचा संताप, पोलीस निरीक्षक ना घेतले धारेवर

कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पालकमंत्री नितेश राणे यांनी कारवाईचे आदेश देवूनही पोलीस विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आला होता. शेवटी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा मटका बुकी असलेला मटका किंग महादेव रमाकांत घेवारी याच्या कणकवली बाजारपेठेतील गोडावूनमध्ये मटका कलेक्शन सुरु असताना पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वत: गुरुवारी दुपारी 4 वाजता धाड टाकली. या धाडीनंतर कणकवली पोलीस निरिक्षक अतुल जाधव यांना कळवण्यात आले. या कारवाईत संशयित आरोपी महादेव घेवारी सह 12 जणांना अटक करण्यात आली आहे. या मटका जुगाराचे 2 लाख 73 हजार 725रोख रक्कमेसह लॅपटॉप व मटका जुगाराच्या पावत्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीसांचे लक्तरे वेशीवर निघाली आहेत.थेट पालकमंत्र्यांनी धाड टाकल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत वृत्त असे की , कणकवली शहरातील भालचंद्र महाराज मठाकडे जाणा-या रोडवर महादेव घेवारी यांचा मटका जुगार चे कलेक्शन करण्याचा आणि तालुक्यातील सगळी रक्कम एकत्र करण्याचा अड्डा आहे. त्या या अड्ड्यावर नेहमीप्रमाणे राजरोजपणे स्वत: महादेव घेवारी मटका कलेक्शन करत असल्याची गोपनीय माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी 4 वाजता पालकमंत्र्यांचा ताफा थेट मटका किंग महादेव घेवारी याच्या थेट गोडावूनकडे पोहोचला.काही क्षणात पालकमंत्र्यांनी मटका बुकींग चाललेल्या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी स्वत: महादेव घेवारी याच्यासह 12 जण मटका जुगाराच्या पावत्या , रोख रक्कम व लॅपटॉपवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मटका स्विकारत असताना आढळून आले.

*पोलीसांनी 12 जणांनावर केली कारवाई,गुन्हे दाखल –
कणकवलीत घेवारी यांच्या गोडावूनवर टाकलेल्या धाडीत मटका कलेक्शन करताना 12 जण आढळून आले. त्यामध्ये महादेव रामकांत घेवारी (६५, रा. कणकवली बाजारपेठ), रवींद्र श्रीपत चव्हाण (४४, रा. कणकवली, टेंबवाडी ), मयुर मनोहर पांडव (३० रा. जानवली, वाकाडवाडी ), संदीप शंकर पडवळ (४६, रा. कणकवली, कनकनगर, ) चंद्रकांत शंकर गवाणकर ( 57, कणकवली , परबवाडी) , प्रशांत शशिकांत घाडीगावकर (४6, रा. वरवडे), महेश आत्माराम बाणे (२७ रा. कणकवली, मधलीवाडी ) , अनिल श्रीपत पाष्टे ( 48 , कलमठ , लांजेवाडी ) , सतीश विष्णू गावडे ( 40 , वागदे , गावठणवाडी ) , संतोष शंकर राठोड ( 43, कलमठ, गावडेवाडी ) तुषार यशवंत जाधव ( 42, वागदे , सावरवाडी ) , महेंद्र चंद्रकांत देवणे ( 35 कणकवली , बाजारपेठ) यांचा सामावेश असून या सर्वही संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. या संशयित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


पालकमंत्र्यांनी पोलीस अधिक्षक मोहन दहिकर यांना सुनावले

पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे , अशा सक्त सुचना पोलीस विभागाला दिल्या होत्या. तरीदेखील मटका जोमात चालू असल्याची माहिती पालकमंत्र्यांना मिळाली. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा मटका किंग असलेल्या महादेव घेवारी यांच्यावर स्वत : धाड टाकत त्या घटनास्थळावरुन थेट जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांना व्हिडिओ कॉल करत हे जिल्ह्यात काय चालले आहे ? अशाने जिल्ह्याची प्रगती होणार आहे का ? भर बाजारपेठेत हा घेवारी मटक्याचे कलेक्शन करत आहे. पोलीस काय करताहेत ? उद्याच जातो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देतो, मला हलक्यात घेवू नका , अशा शब्दांत चांगलेच खडेबोल सुनावले.


पोलीस निरिक्षक अतुल जाधव यांना धरले धारेवर

कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकल्यानंतर पोलीस अधिक्षकांपाठोपाठ कणकवली पोलीस निरिक्षकांनी फोन केला. त्यानंतर काही वेळात पोलीस निरिक्षक अतुल जाधव दाखल झाले. त्यावेळी तुम्ही कणकवलीत आल्यानंतर पहिल्यांदा या घेवारी याला उचला असे आदेश दिले होते. तरीदेखील हे काय चालले आहे ? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी पकडल्यानंतर तुन्ही कारवाई करणार का ? या घेवारी वर कठोर कारवाई झाली पाहिजे. जिल्ह‌याचे भवितव्य बिघडवणा-याला सोडणार नाही . पोलीसांनी देखील या घेवारी याच्या घराचा सर्च घ्यावा. यातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे , असे गुन्हे दाखल करा अशा सुचना कडक शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी देत चांगलेच धारेवर धरले. तसेच या गुन्ह्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , कोकण पोलीस महानिरिक्षक यांच्याकडे देण्यात येईल.

पालकमंत्र्यांसमोर पोलीस विभागाचे पितळ उघडे

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीतील मटका किंग महादेव घेवारी याच्या अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर पोलीसांचे पितळ उघडे पडले आहे. कणकवली पोलीस ठाणे पासून 500 मीटरच्या अंतरावर घेवारी हा गेले कित्येक वर्ष कोट्यावधी रुपयांचा मटका स्विकारत होता. मात्र पोलीसांचा आर्शिवाद असल्याने अनेकदा कारवाई टळत होती. काही महिन्यापूर्वी कणकवली पोलीस निरिक्षकांना घेवारी मटका घेतो, याबाबत स्वत: पालकमंत्र्यांनी कारवाईची सुचना केली होती. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष केला गेला. शेवटी पालकमंत्र्यांच्या कारवाईनंतर पोलीस विभागाचे पितळ उघडे पडले.

ऑनलाईन मटका घेतानाचा लॅपटॉप सुद्धा ताब्यात

कणकवलीत महादेव घेवारी हा मटक्याचा पावत्यांसह ऑनलाईन बुकींग व्हॉट्सअॅपवर घेत होता. त्यावेळी पालकमंत्र्यांनी धाड टाकल्यानंतर लाईव्ह मटका कशा प्रकारे स्विकारला जातो , याची मोडस स्वत: पाहिली. मोठ्या प्रमाणात मटका स्विकारला जात होता. पोलीसांनी लॅपटॉप , मटका जुगाराच्या पावत्या , डाय-या, मोबाईल व अन्य साहित्य पोलीसांनी जप्त केले आहे.या कारवाईत साधारण 2 लाख 73 हजारांची 725रोख रक्कम आढळून आली आहे. महादेव घेवारी सह 12 जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक जाधव निरुत्तर

दरम्यान ना. नितेश राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना माहिती नसलेली मटका बुकिंग च्या उलढालीची जागा दाखवण्यासाठी बोलावले असता पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातून यायला तब्बल अर्धा तास लागला. त्यामुळे पालकमंत्री नाम. नितेश राणे अजूनच संतप्त झाले होते. पोलीस निरीक्षक अतुल जाधव घटनास्थळी आल्यावर पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी हे तुमच्या नाकाखाली नेमकं काय सुरू आहे ? असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे उत्तरच नव्हते. नेहेमीप्रमाणे कारवाई करतो असे उत्तर देऊन ते गप्प बसले.


मटका जुगारातून सिंधुदुर्गातील संसार बरबाद होऊ देणार नाही, असे प्रकार मी खपून घेणार नाही

ना. नितेश राणे यांनी आपला संताप व्यक्त करताना मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढी बिघडवायची नाहीय. असे धंदे कायमचे बंध झाले पाहिजेत. याबाबतीत तर मी काहीही खपवून घेणार नाही. त्यामुळे यावर जे काय कारवाई कराल ती याच ठिकाणी करा. माझ्यासमोर कारवाई झाली पाहिजे.अशा सक्त सूचना केल्या. तसेच त्या त्या अड्ड्यात झाडाझडती घेतली असता एकट्या महादेव रमाकांत घेवारी यांच्या परिधान केलेल्या कपड्यांतच तब्बल ५७ हजार रुपये सापडले. तसेच टेबल मांडून बसलेल्या ठिकाणी २ लाख २१ हजार ७१५ रुपये सापडले. ही घटना आहे तशी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सांगणार आहे. असाही इशारा यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.

error: Content is protected !!