मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा पालकमंत्री नितेश राणेंना टोला
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल स्वातंत्र्यदिनीच वाळू व्यावसायिक युवकांचे हात तोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले.युवक म्हणजे देशाचं भविष्य असं नेहमी म्हटलं जातं. परंतु ज्यांच्या हातात आज भविष्य घडविण्याची ताकद आहे त्यां युवकांना राज्यकर्ते दुर्लक्षित करत आहेत ही शोकांतिका आहे. सिंधुदुर्गातले अनेक युवक उत्तम शिक्षण घेऊन बाहेर शहरांकडे धाव घेतात, कारण जिल्ह्यात रोजगाराच्या संधी जवळजवळ नाहीच. सरकारी नोकर्या मर्यादित आहेत, खासगी उद्योग उभे राहिलेले नाहीत, आणि जेवढे छोटे व्यवसाय आहेत ते कुटुंब सांभाळायला अपुरे पडतात.सिंधुदुर्गात गोव्यापेक्षाही लांब समुद्र किनारा, गडकिल्ले,पर्यटनस्थळं, औषधी वनस्पती, मासेमारीसाठी पोषक वातावरण इत्यादी सर्व साधनं रोजगार निर्माण करू शकतात. पण यासाठी ठोस नियोजन आणि प्रामाणिक अंमलबजावणी हवी. स्थानिकांना पर्यटनात रोजगार मिळावा, मत्स्य व्यवसाय आधुनिक करावा, सेंद्रिय शेतीला बाजारपेठ मिळवून द्यावी,अशा उपाययोजना न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक हे केवळ मतं मिळविण्याचं साधन म्हणून पाहणे योग्य नाही.सिंधुदुर्गाच्या युवकांचे हात तोडण्याची धमकी देणाऱ्यांनी लक्षात असू द्या हा हात जर कामाला लागला तर जग घडवू शकतो आणि जर हा हात रागावला तर मात्र सत्ताही उलथवू शकतो.
जिल्ह्याचे पालक म्हणून नितेश राणे यांनी हात तोडण्याचे आदेश देण्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना पर्यटन पूरक शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालकमंत्री नितेश राणे यांचा जाहीर सत्कार करेल असे विधान उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी या पत्रकाद्वारे म्हटले आहे.













