कुडाळ : कुडाळ शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असून, त्यामुळे रस्ते अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि अगदी शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातही ही जनावरे बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. आज दुपारी संत राऊळ महाराज कॉलेजजवळ मोकाट जनावरे रस्त्यावर बसलेली होती.
शहरात सध्या अनेक ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध किंवा कडेला बसलेली दिसतात. त्यामुळे वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ही जनावरे अंधारात स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. यामुळे कुणाही नागरिकाचा बळी जाऊ शकतो.
या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेकदा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने गाड्या थांबवाव्या लागतात, ज्यामुळे मागे येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावतो. परिणामी, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. या परिस्थितीत पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.