पेट्रोल डिझेलसह इंधनांचा काटकसरीने वापर करणे.. ही तर काळाची गरज…!

युद्धजन्य परिस्थितीपेक्षाही वाढते प्रदूषण व ग्लोबल वॉर्मिंग जीवसृष्टीसाठी धोक्याचीच घंटा..!!

💡फ्लॅशलाईट🔦@प्रसाद गावडे✍🏻

दिवसेंदिवस वाढते प्रदूषण,बेसुमार जंगलतोड आणि हवामान बदलामुळे पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पाहता येत्या काळात जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात चालले आले आहे. काल देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशवासीयांना एका कार्यक्रमात संबोधताना इराण- इस्त्राईल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेने पेट्रोल डिझेलचा काटकसरीने वापर करण्याबाबत सूचित केले. खरं तर पृथ्वीचा वाढता असमतोल पाहता पेट्रोल-डिझेल सह इंधनांचा काटकसरीने वापर करणे ही काळाचीच गरज आहे.”जगा सांगे ब्रम्ह ज्ञान,स्वतः कोरडे पाषाण ” असे उपदेश लोकं पटवून घेणार नाहीत तर त्यासाठी सरकार म्हणून काटकसरीबाबत काही गोष्टींचे आदर्श लोकांसमोर घालून देणे तितकेच महत्वाचे आहे.यासाठी सरकार म्हणून कोणती धोरणे आखली जाणार आहेत,काय उपाययोजना केल्या जाणार आहेत हे लोकांपर्यंत पोहचणे तितकेच आवश्यक आहे. अहो, जी जनता देशातल्या काय किंवा राज्यातल्या कोणताही मंत्री वा आमदार-खासदारांच्या भेटीगाठी दौऱ्यातील शासकीय व खाजगी वाहनांचे ताफेच्या ताफे रस्त्यावर दैनंदिन पाहते त्या जनतेचा विश्वास देण्यासाठी प्रशासकीय कारभारात काही बदलाव व सुधारणा अत्यावश्यक आहेत. सरकार म्हणून या वाहनांच्या ताफ्यांवर कडक निर्बंध आणणे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. याशिवाय प्रशासकीय कारभारात बदलावं व सुधारणा आणून अनावश्यक बैठका टाळल्या गेल्या पाहिजेत.गावा गावात काम करणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या वा जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका, शिबिरे,ट्रेनिंग प्रोग्रॅम यासाठी बोलावणे पूर्णपणे टाळून व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणालीचा वापर करून बैठका शिबिरे ट्रेनिंग आयोजित केली गेली पाहिजेत. खरंतर फेब्रुवारी पासून चाललेला युद्धकाळ पाहता प्रशासकीय स्तरावर मार्चमध्येच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दौरे, फ़िरती आदी प्रशासकीय कामकाजासाठी पेट्रोल डिझेलवर वर चालणाऱ्या आलिशान गाड्या विकत न घेता बॅटरी उर्जेवर चालणारी वाहने कामकाजात आणण्यासाठी बंधनकारक केले गेले पाहिजे होते जे एकप्रकारे आदर्शवत ठरले असते.राष्ट्रीय महामार्गांवर टोल प्लाजांच्या ठिकाणी लांब रांगांमुळे ज्या पद्धतीने अनावश्यक इंधन जाळले जाते त्यावर वेळीच उपाययोजना करत सरकारने टोल वसुलीत सुधारणा लागू करणे देखील तितकेच गरजेचे आहे. एकूणच पेट्रोल डिझेल काटकसर वापराबाबत सरकारकडून काही आदर्श घालून दिले गेलेच पाहिजेत. तरच जनता सकारात्मक बाजूने विचार सुरु करेल अन्यथा नेहमीप्रमाणे एका कानाने ऐकतील दुसऱ्या कानाने सोडून देतील असे होऊ शकते. “इंधनांचा काटकसरीने वापर करणे” या ज्वलंत प्रश्नावर काम करत असताना देशहित साध्य करायचं असेल तर लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी आदर्शवादी उदाहरणे घालून देत “काटकसर” लोकांच्या डोळ्यांना दिसेल व मनावर बिंबवली जाईल असा वास्तववादी कारभार करणे आवश्यक आहे तरच उद्याचं भविष्य उज्वल आहे; अन्यथा…….

-प्रसाद बाळकृष्ण गावडे✍🏻

error: Content is protected !!