मृत्यूचे कारण अस्पष्ट
देवगड : जामसंडे-सोहनीवाडी येथील रहिवासी संतोष मोहन कदम (४२) यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास गावातील एका शेतविहिरीत तरंगताना आढळला. शुक्रवार सकाळपासून बेपत्ता असलेल्या संतोष कदम यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे संतोष कदम हे शुक्रवारी सकाळी ८ वाजता कामासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. शनिवारी दिवसभर कुटुंबीय आणि गावातील लोक त्यांचा शोध घेत होते.
शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मुलगा दयानंद याला सोहनीवाडी येथील भोवर यांच्या शेतातील विहिरीत वडिलांचा मृतदेह तरंगताना दिसला. त्याने तातडीने ग्रामस्थांना याची माहिती दिली आणि त्यानंतर देवगड पोलिसांना कळवण्यात आले.
माहिती मिळताच, सहाय्यक उपनिरीक्षक अनिलकुमार पवार, पोलिस हवालदार आशिष कदम, विश्वास पाटील आणि होमगार्ड जोईल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. संतोष कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Subscribe










