मालवण : नागपंचमीच्या रात्री, २९ जुलै रोजी मालवण शहरातील धुरीवाडा रेवतळे परिसरात ७.५ फुटी अजगरामुळे खळबळ उडाली. रात्री सुमारे १०.३० च्या सुमारास सचिन आरोलकर यांच्या परिसरा लगत हा मोठा अजगर आढळून आला.
अचानक समोर आलेल्या या अजगराला पाहून आरोलकर यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सर्पमित्र अक्षय राजपूत यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच सर्पमित्र अक्षय राजपूत यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत तेजस आरोलकर, नार्वेकर व अन्य नागरिकांनी अजगर पकडण्याच्या कार्यात त्यांना मदत केली.
अजगराचा आकार आणि त्याचे वजन यामुळे त्याला पकडणे आव्हानात्मक होते, परंतु अक्षय राजपूत यांच्या सर्पमित्रामधील अनुभवामुळे त्यांनी मोठ्या कौशल्याने अजगराला सुरक्षितपणे पकडले. पकडल्यानंतर त्यांनी अजगराला मालवण येथील देवलीच्या घनदाट जंगलात नेऊन नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून दिले.
नागपंचमीच्या दिवशीच अजगर आढळल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्र अक्षय राजपूत यांच्या तत्परतेमुळे आणि योग्य हाताळणीमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अशा घटनांमध्ये सर्पांना मारण्याऐवजी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.