इन्सुली खामदेव नाका येथे भीषण अपघात

ट्रक धडकेत युवती ट्रकखाली सापडून गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे आज रात्री एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने दिक्षा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) ही युवती गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तात्काळ महामार्गावर वाहतूक रोखून धरल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एका भरधाव ट्रकने दिक्षा नारुजीला जोरदार धडक दिली. या धडकेत दिक्षा ट्रकखाली सापडून गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान दाखवत दिक्षाला ट्रकखालून बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त ट्रकचालकाला जाब विचारत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवली. अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

error: Content is protected !!