किचन हेल्परची फसवणूक

गुगल पे पासवर्डचा गैरवापर करत ७५,००० रुपयांची लुबाडणूक

वेंगुर्ला : वेंगुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये किचन हेल्पर म्हणून काम करणाऱ्या दर्शन दत्तात्रय भरकर यांची त्यांच्याच सहकाऱ्याने गुगल पे पासवर्डचा गैरवापर करून ७५,००० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना ३ जुलै रोजी पहाटे घडली आहे. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी संजीत कुमार सिंह याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन करमरकर (वय ३८, मूळ राहणार पोस्ट वेश्वी बाजारपेठ, ता. मंडणगड जि. रत्नागिरी) यांनी त्यांच्या विश्वासातील सहकारी, बिहारमधील भोजपूर येथील सियारुवा येथील संजीत कुमार सिंह (वय २१) याला गुगल पेचा पासवर्ड दिला होता. संजीतने याच विश्वासाचा गैरफायदा घेत ३ जुलै रोजी पहाटे २.२२ आणि ४.५३ वाजण्याच्या सुमारास करमरकर यांच्या गुगल पे खात्यातून एकूण ७५,००० रुपये काढून घेतले. यामुळे दर्शन करमरकर यांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

या घटनेनंतर दर्शन करमरकर यांनी तात्काळ वेंगुर्ला पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, संजीत कुमार सिंह याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३१६ (२) आणि ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर करत आहेत. या घटनेमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये पासवर्डची सुरक्षितता आणि कोणावर विश्वास ठेवावा याबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!