सामाजिक कार्यकर्ते आय. वाय. शेख यांचे कुडाळ आगार प्रमुखांना निवेदन
कुडाळ : कुडाळ आगारातून सुटणाऱ्या कुडाळ – वालावल मार्गावरील बसफेऱ्या बंद असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बसफेऱ्या तत्काळ सुरू करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आय. वाय. शेख यांनी कुडाळ आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, सकाळी ०५:५० वा. सुटणारी कुडाळ-वालावल-माऊली मंदिर ही बस फेरी अनेक दिवसांपासून बंद आहे. ही फेरी पूर्वी नियमितपणे चालू होती व बसच्या अधिकृत मार्गफलकावर सुद्धा “वालावल-माऊली मंदिर” असा स्पष्ट उल्लेख आहे. सद्यस्थितीत या मार्गावर धावणाऱ्या वस्तीतील प्रवाशांसाठी असलेल्या बस गाड्या प्रचंड गर्दीमुळे भरून जातात आणि त्यामुळे विद्यार्थी, शाळा-महाविद्यालयीन तरुण, तसेच कुडाळला बाजारासाठी जाणारे विक्रेते यांना प्रवास करणे शक्य होत नाही. हीच अडचण लक्षात घेता हि सकाळची फेरी सुरु करण्यात आली होती. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कुडाळ येथे वेळेवर पोहोचणे शक्य होत असे. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुडाळ येथे किंवा तिथून पुढे जाण्यासाठी लागणारी “कनेक्टिंग बस” मिळवणे ही या फेरीमुळे शक्य होत असे. त्यामुळे ही बस फेरी पुन्हा त्वरित सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.
दुपारी १२:३० वा. सुटणारी कुडाळ-वालावल-माऊली मंदिर ही बस फेरी वेळेवर आणि नियमितपणे चालवणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः शाळा आणि महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी ह्या बस फेरीची वाट पाहत असतात. सद्यस्थितीत या फेरीची वेळ अचूक न ठेवल्यामुळे त्यांना बस मिळण्यात मोठी अडचण होते. अनेक वेळा उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना उभं राहून, बसचा पास असूनही इतर पर्याय शोधावा लागतो, ज्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक नुकसान होते. त्यामुळे ही बस वेळेवर आणि प्रत्येक दिवशी नियमितपणे चालवली जावी, ही विनंती आहे.
दुपारी १३:१५ वा. कुडाळ-वालावल-कवठी ही बस गेल्यानंतर थेट १५:२० वा. पुढील बस उपलब्ध होते. या दरम्यान जवळपास २ तासांपर्यंत वालावल गावाच्या दिशेने एकही बस उपलब्ध नसते. विशेषतः विविध शाळा-महाविद्यालयांचे वेळापत्रक बेगवेगळे असल्याने, काही विद्यार्थी लवकर सुटतात तर काही उशिरा. याशिवाय, कुडाळच्या आजूबाजूच्या भागांतून (साळगाव, पणदूर, ओरोस, पिंगुळी आदी) शाळा-महाविद्यालय संपल्यानंतर परत येणाऱ्या विद्यार्थ्यांना या वेळेत बस मिळत नाही, व त्यांना रस्त्यावर थांबावे लागते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे दुपारी १४:१५ वा. सुटणारी कुडाळ-वालावले माऊली मंदिर-कोरजाई ही फेरी तात्काळ पुन्हा सुरू करणे ही काळाची गरज आहे. तेव्हा लवकरात लवकर या बसफेऱ्या पूर्ववत सुरू करून नागरिकांसह विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आय. वाय. शेख यांनी कुडाळ आगारप्रमुखांकडे केली आहे.