तिसरा संशयित ताब्यात

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा निर्माण प्लाझा येथे राहणाऱ्या प्रिया पराग चव्हाण या विवाहितेने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने आणि तिचा मुलगा आर्य माने यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी प्रणाली माने हिचा पती मिलींद आनंदराव माने (४८, रा. देवगड) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी चौकशीसाठी मिलिंद माने याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले मात्र त्याची तब्येत बरी नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

शुक्रवारी प्रिया चव्हाण यांनी आपल्या राहत्या फ्लॅटमधील बंद खोलीत ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर प्रियाच्या आई-वडिलांनी आक्षेप घेत तिच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सावंतवाडी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर याप्रकरणी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि महिला पोलीस अधिकारी माधुरी मुळीक यांनी सखोल तपास करून संशयित प्रणाली माने आणि तिचा मुलगा आर्य माने या दोघांविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता प्रणालीच्या पतीला याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करत आहेत.

error: Content is protected !!