समुद्रात नौका उलटून झाला होता बेपत्ता
दांडी श्रीकृष्ण मंदिरानजिकच्या किनाऱ्यावर आढळला मृतदेह
मालवण : मालवण नजीकच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली ‘संगम’ ही बिगर यांत्रिक नौका उलटून जितेश वाघ (रा. मेढा जोशीवाडा, ता. मालवण) हा मच्छिमार बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर तात्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. दरम्यान, आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिकांना त्याचा मृतदेह दांडी श्रीकृष्ण मंदिर नजिकच्या किनाऱ्यावर मिळून आला आहे.
मंगळवार दि. ८ जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कीर्तिदा तारी (रा. मेढा जोशीवाडा, ता. मालवण) हे त्यांची IND-MH-५-NM-५१७५ क्रमांकाची ‘संगम’ ही नौका घेऊन मालवणसमोरील समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत सचिन केळूसकर आणि जितेश वाघ हे खलाशी म्हणून होते. सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास मासेमारीसाठी जाळी सोडत असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि समुद्रातील जोरदार लाटा नौकेला धडकल्या. या धडकेने नौका तात्काळ उलटली आणि त्यातील तिघेही मच्छिमार समुद्रात पडले. नौका उलटल्यानंतर कीर्तिदा तारी आणि सचिन केळूसकर यांनी नौका धरून ती सरळ करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कीर्तिदा तारी यांनी जितेश वाघ यांना त्यांच्यापासून अंदाजे १५ ते २० फूट अंतरावर पोहताना पाहिले. मात्र, नौका सरळ करून त्यांना नौकेत घेण्यासाठी जेव्हा ते त्यांच्या दिशेने गेले, तेव्हा जितेश वाघ त्यांना कोठेही दिसून आले नाहीत. या घटनेनंतर घाबरलेल्या कीर्तिदा तारी आणि सचिन केळूसकर यांनी जवळच्या खडकाळ भागात जितेश वाघ यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तात्काळ स्थानिक मच्छिमारांना बोलावून पुन्हा शोधकार्य सुरू केले, परंतु जितेश वाघ यांचा काही थांगपत्ता लागला नाही.
या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांनी मालवण तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक, मालवण यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्हा आपत्ती निवारण कक्ष येथे या घटनेची माहिती देण्यात आली असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. एनडीआरएफच्या पथकाने अत्याधुनिक साधनांच्या मदतीने शोधमोहीम सुरू होती. तसेच स्थानिक मच्छिमारां कडूनही त्याचा शोध सुरु होता.