आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज; सावंतवाडी तालुक्यातील घटना
मानसिक आजाराने होती त्रस्त
सावंतवाडी : कुणकेरी- रेवीचे भाटले येथे अंकिता आप्पा सावंत (वय ३५) या विवाहित महिलेचा मृतदेह शेतविहिरीत आढळून आला. तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची खबर भाऊ मनोहर गावडे यांनी पोलिसांना दिली आहे.
दरम्यान आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकले नसले तरी दोन वर्षापासून तिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ती माहेरी आली असताना ही घटना घडली. मूळ असनिये मात्र सध्या माहेरी कुणकेरी येथे आलेल्या अंकिता सावंत या शनिवारी सकाळी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या घरी परत न आल्याने कुटुंबातील सदस्यांकडून शोधाशोध करण्यात आला. त्याचवेळी कुणकेरी येथील शेतविहिरीत अंकिता यांचा मृतदेह कठडा नसलेल्या शेतविहिरीत तरंगताना आढळून आला. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीसांकडून या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविण्यात आला. अंकिता यांचे सासर हे असनिये येथे असून माहेर कुणकेरी येथे आहे. शुक्रवारी त्या आपल्या कुणकेरी येथील माहेरी आल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली असून तिच्यावर मागील दोन वर्षांपासून गोवा-बांबुळी येथील रूग्णालयात उपचार सुरू होते, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. मृत अंकिता सावंत यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान या घटनेनंतर सावंतवाडी तालुक्यात आत्महत्येच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहेत.