मद्यप्राशन केलेल्या दोघा वाहन चालकांना दहा हजाराचा दंड

सावंतवाडी : मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्याप्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने मंगळवारी दोघा वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले. या दोघांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपये असा दंड ठोठावला आहे. ही कारवाई सावंतवाडी-आंबोली मार्गावरील सातोळी-बावळाट तिठा येथे करण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखेच्या पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सापळे यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहन चालकांच्या बेपर्वाईमुळे अपघात होऊ नयेत, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, ड्रंक अँड ड्राईव्ह, फॅन्सी नंबर प्लेट, अतिवेगाने वाहने चालविणे आदी प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या आदेशान्वये व जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.

बावळाट तिठा येथे वाहतूक शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सापळे, महेंद्र बांदेकर, पोलीस कॉन्स्टेबल उदयसिंग खांडेकर, विठ्ठल धुरी, अमोल गोसावी, रुक्मानंद मुंडे हे वाहनांची तपासणी करीत असताना दोन वाहन चालकांच्या वाहनांची कागदपत्रे तपासणी तसेच चालकांची ब्रेथ अॅनालायझरने तपासणी केली असता चालकांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पुणे येथील या दोघा वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या दोघांनाही न्यायालयाने प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला. पोलीस अधीक्षक श्री. दहिकर यांच्या आदेशान्वये वाहन नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

error: Content is protected !!