हळवल शिवडाव जोडणारा रस्ता पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत

कणकवली : तालुक्यात रविवार रात्री पासून धो धो पाऊस कोसळत आहे. अशातच तालुक्यातील सर्वच नदी नाले तुडुंब होऊन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. रविवारी मध्यरात्री पासून तालुक्याला पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील गडनदी अगदी तुडूंब भरून वाहत होती. तर शिवडाव, हळवळ या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुक व्यवस्था काहीकाळ ठप्प झाली होती. हळवल गावातील भाकरवाडी – शिवडाव जोडणाऱ्या रस्त्यावर पूरस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास काहीसे पाणी कमी झाले होते. मात्र मार्गावरील वाहतूक ठप्प होती. येथील भागात ३० ते ३५ मिटरच्या भागात सौम्य पाऊस कोसळला तरी पूरजन्य परिस्थिती निर्माण होते.

सोमवार पासून शाळा देखील सुरू झाल्या. मात्र रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे शालेय बसफेरी देखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशीपासून नुकसानास सुरुवात झाली आहे. तर बस ने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचाही खोळंबा झाला आहे.

याबाबत गेली अनेक वर्षे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधले जात होते. मात्र येथील परिस्थिती माहिती असूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. अजून किती दिवस अशा पुरस्थितीशी सामना करायचा असा सवालही येथील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!