पावशी येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद

कुडाळ : भेडल्या माडाच्या पानाच्या विक्रीचा व्यवसाय करणारा परप्रांतीय पनफुलित मुंशीलाल बिंद (२८. सध्या रा. पावशी, म्हाडेश्वरवाडी, मूळ रा . उत्तरप्रदेश) याचा मृतदेह तो भाड्याने राहत असलेल्या खोलीत छपराच्या लोखंडी पाईपला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबतची खबर त्याचा चुलतभाऊ कैलाश बाबुराम बिंद (२४. सध्या रा. कुडाळ, मूळ रा. उत्तरप्रदेश) याने कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

कैलाश बिंद याने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, पनफुलित बिंद पावशी तवटे व्हाडेश्वरवाडी येथे भाडयाच्या खोलीत एकटा राहायचा. तो भेडल्या माडाच्या पानांच्या विक्रीचा व्यवसाय करायचा. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो कैलाश याच्या कुडाळ येथील खोलीकडे आला. आज काही काम आहे का? असे विचारले तेव्हा आज कोणतीही ऑर्डर नसल्याचे कैलाश याने सांगताच तो निघून गेला. त्यानंतर शुक्रवारी कैलाश याने त्याला केलेला कॉल त्याने उचलला नाही. म्हणून तो त्याच्या पावशी येथील खोलीवर गेला असता, त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर दरवाज्याच्या फटीतून डोकावून पाहिले असता पनफुलित याचा मृतदेह छपराच्या लोखंडी पाईपला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. त्यानंतर त्याने खोली मालकाला याची कल्पना दिली. कुडाळ पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक श्रीमती आडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवानंद माने व पो. कॉन्स्टेबल सुबोध मळगावकर यांनी पंचनामा केला.

error: Content is protected !!