मंगल कार्यालय चालकाविरोधात गुन्हा दाखल
सावंतवाडी : मुलगा अल्पवयीन असतानाही बनावट जन्म दाखला तयार करून त्याचा एका मुलीशी विवाह लावून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या महिलेला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मुलीच्या नातेवाइकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मुलाच्या आईसह मुलगा व मंगल कार्यालय चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा प्रकार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सावंतवाडी तालुक्यात घडला होता, तक्रारदार महिला सावंतवाडी शहरातील असून तर मुलाचे नातेवाईक कोलगाव परिसरातील आहेत. मुलाच्या आईने आपल्या मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण नाही व तो विवाह करण्यास कायद्याने योग्य नाही, हे माहीत असतानाही अप्रमाणिकपणे व कपटाच्या उद्देशाने मुलीला अंधारात ठेवत बनावट जन्म दाखला तयार करून विवाह लावून दिला. पोलिसांनी मुलाच्या वयाच्या दाखल्याची विभागाकडे पडताळणी केली असता जन्म दाखला बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलाच्या आईसह मुलगा व संबंधित मंगल कार्यालय चालक या तिघांविरोधात दाखल केला. गुन्हा पोलिसांनी शनिवारी तिघांपैकी मुलाच्या आईला अटक केली. तिला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. बनावट जन्मदाखला व रबरी स्टॅम्प कुठे बनवला, या गुन्ह्यात आणखी कोणी त्यांना सहकार्य केले का? अशा विविध मुद्द्यांचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे













