न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलिस कोठडी
वेंगुर्ला : जमीन जागेच्या कारणावरून जमिनीची मोजणी चालू असताना महिलेस मारहाण करणाऱ्या ओंकार कुबल व भानुदास कुबल या दोन्ही युवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
वेंगुर्ला हॉस्पिटल नाकानजीकच्या रहिवासी श्रेया विलास मांजरेकर (४८) यांना जमीन जागेची मोजणी करून नीस लावत असताना हद्दीच्या कारणावरून झालेल्या वादात लगतचे ओंकार तुकाराम कुबल (२३), भानुदास तुकाराम कुबल (२८) यांनी मारहाण केली. या प्रकरणी वेंगुर्ला पोलिसांत भारतीय दंड संहिता कलम ११८, ११५ (२), ३२९, ३२४ (१), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
यातील तक्रारदार मांजेरकर कुटुंब व संशयित आरोपी कुबल यांचे संबंधित जागेसंदर्भात कोर्टात दावा असल्याने गेल्या काही वर्षांपासून संभाषण नाही. २७ मे रोजी दुपारी १२.३० वाजता हॉस्पिटल नाका नजीकच्या महाजनवाडी येथे मांजरेकर यांनी जमीन मोजणी करून शेवटचा नीस लावत असताना ओंकार तुकाराम कुबल याने तक्रारदाराचा पुतण्या शशांक सुरेंद्र मांजरेकर याला धक्काबुक्की केली. त्यावेळी श्रेया विलास मांजरेकर व तिचा दीर सुरेंद्र मांजरेकर त्याला बाजूला करण्यासाठी गेले असता, त्याने श्रेया मांजरेकर यांच्या केसांना धरून खाली पाडले व जवळच असलेल्या ओहोळामध्ये ढकलून दिले.
तसेच पाच-सहा दगड फेकून मारले. ते दगड श्रेया मांजेकर यांच्या गालावर, डोक्यावर, डोळ्यावर बसल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. रक्तही येऊ लागले. या झटापटीत तिचे सोन्याचे मंगळसूत्र व माळ तुटून नुकसान झाले.
पुतण्या शशांक याने ओहोळात पडलेल्या श्रेया मांजरेकर यांना ओहोळाबाहेर आणून घरी नेले. घरी बसलेल्या श्रेया यांना दोन्ही संशयित आरोपी ओंकार कुबल व भानुदास कुबल यांनी लोखडी अँगल व लाकडी रीप घेऊन वार केला. आपल्या वहिनीवर होणारा वार चुकविण्यासाठी सुरेंद्र मांजरेकर पुढे आले असता, त्यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली, असे श्रेया मांजरेकर यांनी वेंगुर्ला पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार ओंकार कुबल व भानुदास कुबल या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनखाली हवालदार भगवान चव्हाण करीत आहेत.













