मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली कुडव टेंब येथे भलेमोठे भगदाड

सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुडव टेंब येथे एक भला मोठा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे माती खचल्याने हा खड्डा पडल्याची माहिती मिळाली आहे. या खड्डयामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हा खड्डा दिसणे कठीण असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. निगुडे येथील माजी सरपंच झेवियर फर्नांडीस यांनी या गंभीर समस्येकडे महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी तात्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.


या धोकादायक खड्ड्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

error: Content is protected !!