मागील अनेक वर्षांपासूनची कुडाळ वासियांची मागणी “अखेर” पूर्ण
प्रसाद गावडेंच्या पाठपुराव्याला मोठं यश
पंचायत समिती कुडाळ अखत्यारीत येणारे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कुडाळ कार्यालय हे मागील अनेक वर्षांपासून ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे मुक्कामी कार्यरत होते. लोकाभिमुख कामकाजाच्या दृष्टीने व तालुक्यातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे कार्यालय कुडाळ पंचायत समितीच्या आवारात असणे आवश्यक होते, मात्र अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे अनेक वर्षांपासून सदरील कार्यालय सिंधुदुर्गनगरी मुक्कामी कार्यरत असल्याने नागरिकांसाठी प्रचंड क्लेशदायक व गैरसोयीचे ठरत होते. याबाबत अगदी सन 2006 पासून कुडाळ तालुक्यातील नागरिकांकडून प्रशासनाकडे स्थलांतरणाची मागणी करण्यात येत होती मात्र दरवेळी काहींना काही कारणे देवून अधिकारी वर्गाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात होती.उपविभागीय कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गट विकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कारभार करायचा नव्हता यासाठीच कुडाळ ला कार्यालय स्थलांतरित केले जात नव्हते अशी चर्चा जिल्हा परिषदेतून कानावर येत होती. यापूर्वी एकदा हे कार्यालय कुडाळ येथे स्थलांतरित करण्यात आले देखील होते मात्र ते पुन्हा ओरोस येथे हलविण्यात आले. कुडाळ पंचायत समिती कार्यालय व ओरोस मुख्यालय यामधील अंतर पाहता ग्रामपंचायत स्तरावरील कामांची इस्टिमेट करून ती मंजूर करून घेणे,15 वित्त आयोग कामे व देयके मंजुरी व इतर आस्थापना विषयक कामकाज करण्यास पंचायत समिती प्रशासनाला व कुडाळ तालुक्यातील नागरिकांना पोरस ते कुडाळ कुडाळ तेवरस असे उलट सुलट हेलपाटे मारावे लागत होते व त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. नागरिकांची होणारी गैरसोय व लोकाभिमुख जलद प्रशासकीय कारभाराची आवश्यकता लक्षात घेता शिवसेना कामगार सेना अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी हे कार्यालय कुडाळ पंचायत समिती आवारात स्थलांतरित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा चालू केला. दरम्यानच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून स्थलांतरीत करण्याचे आदेश देण्यात आले मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून कार्यालय स्थलांतरण कार्यवाहीस टाळाटाळ केली जात होती. अखेर 13 मे रोजी गावडेंनी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या देऊन आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर नंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने 16 मे रोजी कार्यालय स्थलांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करून सोमवार 19 मे पासून कुडाळ येथे कार्यालयीन कामकाज सुरू करण्याचे लेखी पत्र दिले होते. त्यानुसार ग्रामीण पाणीपुरवठा कुडाळ उपविभागीय कार्यालय कुडाळ पंचायत समितीच्या आवारात कार्यान्वित झाले असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.













