सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सावंतवाडी, कणकवली आणि मालवण येथे आहेत. तेथील जाहीर सभामध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. ठाकरेंसोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते आणि महाविकास आघाडी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आज ठाकरे सेनेचे विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी दिली.
महाविकास आघाडीचे कणकवलीतील उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ कणकवली उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणात दुपारी अडीच वाजता सभा होणार आहे. तत्पूर्वी सावंतवाडी येथील गांधी चौकात राजन तेली यांच्या प्रचारार्थ दुपारी ११.३० वाजता ठाकरेंची सभा होईल तर सायंकाळी चार वाजता मालवणच्या टोपीवाला हायस्कूल मैदानात आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ तिसरी सभा होणार आहे.कणकवली येथील सभेसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासभेसाठी देवगड, वैभववाडी सह कणकवली तालुक्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
आज दुपारपर्यंत सभा मंडप आणि परिससराची सफाई देखील पूर्ण करण्यात आली आहे. या सभेला ठाकरेंसोबत माजी खासदार तथा पक्षाचे सचिव विनायक राऊत, उपनेते शरद कोळी यांच्यासह राज्यभरातील महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली आहे.













