ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळेच जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ..!

गावागावातील जल जीवन मिशनची अर्धवट कामे ग्रामपंचायतींनी हस्तांतरित करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव..?

प्रसाद गावडेंचा गंभीर आरोप

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षम व भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळेच जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत योजनांच्या कामांचा पूर्णतः बट्ट्याबोळ झालेला असून जिल्ह्यातील जनता लाभापासून वंचित राहिली आहे. केंद्र सरकारने योजनेसाठी विहित केलेला मुदत कालावधी डिसेंबर 2024 ला संपून देखील आज मितीस जिल्ह्यातील बहुतांश कामे अर्धवट स्वरूपात असून फक्त हाताच्या बोटांवर मोजण्या एवढ्याच योजना प्रत्यक्षात पूर्ण होऊन जनतेला लाभ मिळत असल्याचे भयंकर चित्र जिल्ह्यात आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण पाणीपुरवठाचे विभागाचे अभियंता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना “कंत्राटदाराकडून अर्थवट काम पूर्ण करण्याच्या अटी व शर्तीवर” प्रकल्प ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करून घेण्यासाठी दबाव आणत आहेत अशी माहिती मिळते.प्रत्यक्षात जल जीवन मिशन अंतर्गत येणारी नळ पाणी योजना कागदपत्रे पूर्ण दाखवून शासनाकडे उर्वरित निधी मागायचा व ठेकेदारांशी संगनमत करून टक्केवारी लाटायची.. ‘जनतेला पाणी मिळो या मिळो’ असा छुपा डाव पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांचा आहे. मात्र अर्धवट राहिलेले काम हस्तांतरण प्रक्रियेनंतर ठेकेदाराने पूर्ण केले नाही तर भविष्यात त्याची जबाबदारी कोण घेणार आहे हा खरा प्रश्न निर्माण होतं आहे.त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या धुर्त अधिकाऱ्यांच्या हस्तांतरित करून घेण्याच्या विनंतीला बळी न पडता काम पूर्ण झाल्या हस्तांतरण प्रक्रिया करू नये.


आज गावागावात रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांबाबत जनतेत असंतोष असून विहीर आहे तर पाईप लाईन नाही,पाईप लाईन आहे तर विहीर नाही अशा पद्धतीचा भोंगळ कारभार आहे.वास्तविक पाण्याचा स्त्रोत अंतिम केल्याशिवाय पाईपलाईन जोडणी करणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसताना अभियंत्यांनी निव्वळ टक्केवारीच्या आशेने अगोदर पाईपलाईन व नंतर पाण्याचा उद्भव अशी चुकीची प्रक्रिया राबविली आहे.अडीज वर्षाच्या कालावधीनंतर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत लाभ देणाऱ्या योजना फक्त हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच कार्यान्वित झालेल्या असून अन्य योजनेच्या कामांचा अक्षरश: बट्ट्याबोळ झालेला आहे.खेदाची बाब म्हणजे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ह्याचे सोयरसुतक नसून जनता “हर घर नल” योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहे या गोष्टीशी देणंघेणं नसून अधिकाऱ्यांना फक्त टक्केवारीत इंटरेस्ट आहे असा आरोप गावडेंनी केला आहे.कार्यरंभ आदेशापासून निर्धारित वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर विभागाने नियमानुसार दंडात्मक कारवाई करणे नियमाधीन असताना अधिकारी चिरीमिरी घेऊन मूक गिळून गप्प आहेत. पालकमंत्र्यांनी जलजीवनच्या कामांबाबत विशेष जनता दरबाराचे आयोजन करून कामांचा आढावा घ्यावा अशी मागणी असून कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार करणार असल्याची माहिती शिवसेना कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

error: Content is protected !!