वैभववाडी : सामाजिक बांधिलकी आणि नागरी सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने वैभववाडी नगरपंचायतच्या वतीने मुख्याधिकारी श्री.प्रतिक थोरात यांच्या नेतृत्वाखाली “सेवा हक्क दिनकृती” हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला.
या उपक्रमाचे आयोजन वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या NSS स्वयंसेवकांनी, स्थानिक नागरिकांनी आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहिमा, नागरी सेवा जनजागृती अभियान आणि नागरिक व प्रशासन यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी विविध उपक्रम, पुरविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती दिली.
या प्रसंगी मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांनी नागरिकांच्या हक्क व कर्तव्यांबद्दल महत्त्व पटवून दिले, सक्षम व जबाबदार समाज उभारण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. व्हि. गवळी व NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. व्हि. ए. पैठणे, प्रा. एस. आर. राजे, प्रा.एस.एम.करपे यांनी नगरपंचायतीच्या प्रयत्नांचे कौतुक करुन भविष्यात अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी सदस्यांनी सामाजिक उन्नती आणि सक्रिय नागरी सहभागासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.













