ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम यांनी घेतली आ. निलेश राणेंची सदिच्छा भेट

संतोष हिवाळेकर / पोईप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा पोईप येथील उद्योजक पंकज वर्दम यांनी शनिवारी शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची पोईप येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विभागातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली.

पंकज वर्दम हे पोईप येथील प्रख्यात उद्योजक असून ते ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख आहेत. पोईप विभागातील विकास कामांमध्ये त्यांचे योगदान राहिले आहे. आजवर विभागातील सामाजिक उपक्रमांना त्यांनी वैयक्तिकरित्या देखील मदत केली असून ठाकरे शिवसेनेचे ते विभागातील महत्वाचे पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र गेले काही दिवस ते राजकीय व्यासपीठापासून काहीसे अलिप्त असल्याचे दिसून येत आहे. अशातच शनिवारी मालवण पंचायत समितीच्या पोईप येथील एका कार्यक्रमासाठी आमदार निलेश राणे उपस्थित राहिले असता पंकज वर्दम यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विभागातील विकास कामांवर त्यांनी आ. राणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, मंदार लुडबे, कमलेश प्रभू यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीमुळे नजिकच्या काळात ठाकरे गटाला पोईप विभागात मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!