मुंबई- गोवा महामार्गावर कुडाळ काळपनाका येथील ओव्हरब्रिजवर गेल्या बुधवारी 16 एप्रिल रोजी दुचाकी आणि रोडरोलर यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार रवींद्र भास्कर बागकर (वय 65 वर्षे, रा. नेरूरपार बांधीवडेकर टेम्ब, ता. कुडाळ) यांचे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान आज सकाळी निधन झाले.
नेरूरपार, बांधीवडेकर टेम्ब, तालुका कुडाळ येथील रहिवाशी रवींद्र बागकर (वय 65 ) हे सेवानिवृत जिल्हा बँक कर्मचारी 16 एप्रिल रोजी सकाळी ओरोस येथे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात आपल्या एक्सेस दुचाकीवरुन (MH-07 – AR – 0513) निघाले असता कुडाळ ओव्हर ब्रीजवर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ती पुढे जात असलेल्या रोड रोलरवर आदळली. यात रविंद्र बागकर यांच्या पायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांना तत्काळ ओरोस जिल्हा रुग्णालयात त्यांना रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. मात्र, बागकर गंभीर जखमी होते. त्यांना श्वसनांचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ गोवा- बांबुळी येथे हलविण्यात आले.
गेले काही दिवस त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरु होते. पण त्या दरम्यानच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते.













