“आपलं ठेवावं झाकून अन दुसऱ्याचं पहावं वाकून”
शिवसेनेच्या प्रसाद गावडेंचे उबाठा नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर
सिंधुदुर्ग : मागील दहा वर्षात निष्क्रिय ठरल्याने कुडाळ मालवण मधील जनतेचा असंतोष पाहता उबाठा पक्षाच्या नेत्यांना पराभवाची चाहूल लागलेली असून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते महायुतीचे उमेदवार निलेश राणेंवर घराणेशाहीची टीका करून मतदार संघातील मूळ प्रश्नांना बगल देऊ पाहत आहेत.मात्र एकीकडे राणे कुटुंबावर घराणेशाहीचे आरोप करायचे आणि दुसरीकडे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे व नातेवाईक वरुण सरदेसाई यांचेसमोर लोटांगण घालायचं अशी उबाठा नेत्यांची दुटप्पी भूमिका जनता पार ओळखून आहे.याशिवाय उबाठा ज्या काँग्रेस पक्षा सोबत आघाडीत आहे त्यात श्रीमती सोनिया गांधी,राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादी (शरद पवार) मधील सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काय मत आहे हे उबाठा नेत्यांनी जनतेसमोर जाहीर करावे.निलेश निलेश राणेंचे नेतृत्व हे कार्यकर्तृत्वातून पुढे आलेले असून ते उद्धव किंवा आदित्य ठाकरेंसारखे लादलेले नेतृत्व नाही.”आपलं ठेवावं झाकून अन दुसऱ्याचं पाहावं वाकून” अशी अवस्था उबाठा नेत्यांची असून मतदार संघातील मूळ प्रश्नांवर बोलायला तयार नाहीत. कुडाळ मालवण मतदार संघ मागील दहा वर्षे खितपत का राहिला, का विकसित होऊ शकला नाही, मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत विधिमंडळात ताकदीने का प्रश्न उपस्थित करून सोडवू शकला नाहीत, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने कुडाळ मालवण मतदार संघात येणाऱ्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व तालुका ग्रामीण रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टर येण्यासाठी खासदार वं आमदान म्हणून कोणते प्रयत्न केलात हिम्मत असेल तर याची उत्तरे द्या. माजी खासदार विनायक राऊत असो वा आमदार वैभव नाईक हे जबाबदार उबाठा नेते 2014 मध्ये लावलेली कॅसेट तीच पुन्हा 2024 मध्येही जनतेला ऐकवू पाहत आहेत. तुमच्या मातोश्रीवरील निष्ठेशी जनतेला सोयरे सुतक नसून मतदार संघावर तुम्ही केलेल्या अन्यायाचा वचपा कुडाळ मालवणची जनता येत्या 20 तारीख ला काढणार आहे असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.