सिद्धिविनायक हा दोन वर्षापासून बेपत्ता आहे हे पोलिसांना माहीत असूनही पोलिसांनी त्याचा शोध का घेतला नाही? याचे उत्तर पोलीस देतील का?
सिंधुदुर्ग : मूळ चेंदवण तालुका कुडाळ येथील बेपत्ता सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर या बेपत्ता असणाऱ्या युवकाबाबत त्याचे गावातील नातेवाईक व लोकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धिविनायक याचे गावातील वागणे हे मनमिळावू व चांगले होते.गावात प्रकाश उर्फ पक्या या नावाने त्याला ओळखले जायचे व तो सर्वांशी मिळून मिसळून राहणारा होता. मात्र तो कुडाळमधील एका बार व रेस्टॉरंट मध्ये कामास राहिल्यानंतर त्या ठिकाणी अनधिकृत दारूचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या संपर्कात आला.त्यानंतर सिद्धिविनायक याने आपल्या आईच्या आजारपणात दारू व्यावसायिकाकडून आईच्या उपचारासाठी उसनवार पैसे घेतले होते. सदर पैसे सिद्धिविनायक हा परत करू न शकल्याने त्याला स्वतःच्या नावावर दारूच्या केसेस घेण्यास भाग पाडण्यात आले . त्यातूनच त्याच्यावर कुडाळ पोलिसांकडून एक व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन अशा एकूण चार केसेस दाखल झाल्या.
त्याच्या नातेवाईकाकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धिविनायक हा कधीही अनधिकृत दारू व्यवसाय करत नव्हता. मात्र सिद्धिविनायक याच्यावर दाखल गुन्ह्यांप्रमाणे कुडाळ येथील मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात SCC /372/2021, SCC/195/2022, SCC/359/2022, SCC/381/2022 या प्रोहिबिशन ॲक्ट कलम ५६ ई नुसार केसेस सुरू आहेत. त्या केसेस कामी सिद्धिविनायक बिडवलकर हा दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी शेवटचा न्यायालयात हजर होता. त्यानंतर तो कधीच न्यायालयात हजर झाला नाही. मागील दोन वर्षात न्यायालयाने त्यास अनेक वेळा समन्स व वॉरंट काढले आहेत. मात्र पोलिसांकडून सदर समन्स, वॉरंट ची आज पावेतो कधीही बजावणी झालेली नाही. सिद्धिविनायक हा बेपत्ता आहे हे कुडाळ व निवती पोलिसांना माहित असूनही त्यांनी सिद्धिविनायक चा शोध घेण्यासाठी कोणतीच पावले उचलली नाहीत. न्यायालयाकडून आलेल्या समन्स वॉरंट वर “सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर आढळून येत नाही ” असा शेरा मारून सदर समन्स न्यायालयाकडे परत केले जात असत. वास्तविक पाहता न्यायालयाने काढलेले समन्स व वॉरंट ची बजावणी एखाद्या व्यक्तीवर होत नसल्यास त्याच्याविषयी शोध मोहीम राबवणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र पोलिसांकडून सदरील समन्स व वॉरंट आरोपी मिळून येत नाही असा शेरा मारून परत कोर्टाकडे पाठवण्यापलीकडे पोलिसांनी कोणतेही काम केले नाही. आज रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुडाळ यांच्या न्यायालयाकडून पोलिसांना बेपत्ता सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर याचा शोध घेऊन हजर करणे/तजवीज करण्याचे आदेश आहेत मात्र तरीही पोलिसांकडून कोर्टाच्या आदेशाची दखल घेतली जात नाही. जर पोलिसांनी जानेवारी, फेब्रुवारी 2023 मध्ये सिद्धिविनायक यास न्यायालयाने काढलेले समन्स व वॉरंट याची अंमलबजावणी केली असती तर आज सिद्धिविनायक बेपत्ता झालाच नसता. असेही कायद्याचे जाणकार आपले मत व्यक्त करत आहेत.
सिद्धिविनायक बिडवलकर याचे जवळचे नातेवाईक नसल्याने आजपर्यंत कोणीही पोलिसांकडे तक्रार केली नव्हती मात्र सिद्धिविनायक हा बेपत्ता असल्याचे पोलिसांचा रेकॉर्डला नोंद होते. तरीही पोलिसांनी सिद्धिविनायक चा शोध घेण्याचा का प्रयत्न केला नाही? याचे उत्तर समोर येणे गरजेचे आहे. मागील पंधरा दिवस कुडाळ पोलीस सिद्धिविनायक बिडवलकर बेपत्ता प्रकरणावर त्याचे नातेवाईक व संबंधितांचे जाबजबाब नोंदवत आहेत. कुडाळ व निवती पोलिसांना सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर हा बेपत्ता आहे हे दोन वर्षापासूनच माहित होते मग त्याचा शोध घेण्यासाठी ते तक्रारीची वाट पाहत होते का? असाही प्रश्न उपस्थित होतो. सिद्धिविनायक याच्या बेपत्ता होण्याबाबत कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे आला नाही तरीही पोलीस सुमोटो तक्रार दाखल करून त्याच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करू शकत होते. तसे त्यांना अधिकारही होते. असे असताना पोलिसांनी एवढा निष्काळजीपणा का केला? या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का? या प्रश्नांची उत्तरे समोर येणे गरजेचे आहेत.. एकंदरीत कुडाळ व निवती पोलिसांकडून सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर बेपत्ता प्रकरणाचा लवकरात लवकर तपास होऊन सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.













