कुडाळ : मालवणी रिल्स आयोजित मालवणी अवॉर्ड शो सोहळा शुक्रवारी रात्री कुडाळ येथे संपन्न झाला. ४ एप्रिल या मालवणी दिवसाचे औचित्य साधून सलग तिसऱ्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा कला सिंधू सन्मान वस्रहरणकार गंगाराम गवाणकर यांना यावेळी प्रदान करण्यात आला. त्याच बरोबर विविध कॅटेगिरीतील मालवणी अवॉर्ड्सचे देखील यावेळी वितरण करण्यात आले.
सन्मान बोलीभाषेचो… अभिमान मालवणी माणसाचो, हि टॅग लाईन घेऊन रिल्स मालवणी यांच्या वतीने या भव्य मालवणी अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन येथील मराठा समाज हॉल मध्ये करण्यात आले होते. ४ एप्रिल हा मालवणी नाट्यसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचा जन्मदिवस. तो दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाचे औचित्य साधून रिल्स मालवणी यांच्या वतीने मालवणी भाषेसाठी कार्य करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था, नाटक, सिनेमा, मालिका, कलाकार याना मालवणी अवॉर्ड देऊन गौरविले जाते. यंदाचे हे या अवॉर्ड्स सोहळ्याचे तिसरे वर्ष होते.
या सोहळ्याचे उदघाटन वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि मच्छिन्द्र कांबळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. रंगमंचाचे उदघाटन उद्योजक दत्ता सामंत यांनी श्रीफळ वाढवून केले. यावेळी गंगाराम गवाणकर, दत्ता सामंत, प्रभकार सावंत, नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, कला दिग्दर्शक सुमित पाटील, रणजित देसाई, संगीतकार विजय गवंडे, प्रणय तेली, रंगकर्मी केदार देसाई, अविनाश वालावलकर, आनंद शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, ओंकार तेली, उद्योजक जितेंद्र सावंत, रिल्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर, तेजस मसके, विठ्ठल तळवलकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी रिल्स मालवणीच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तर प्रभाकर सावंत यांनी देखील शुभेच्छा देताना आपल्या काही मालवणी चारोळ्या देखील सादर केल्या, त्याला रसिकांनी मनमुराद दाद दिली.
रिल्स मालवणीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा कला सिंधू सन्मान वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर याना प्रदान करण्यात आला. शाल श्रीफळ, रोख ११ हजार, सन्मान चिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्कराचे स्वरूप आहे. निवेदक अमर प्रभू यांनी मानपत्राचे वाचन केले.
सत्काराला उत्तर देताना गंगाराम गवाणकर यांनी आपल्या मिश्किल शैलीत काही किस्से सांगून आपण मालवणी भाषेमुळे कसे घडलो हे सांगितले. मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांच्या आठवणी देखील त्यांनी जागविल्या.
त्यांनतर विश्वजित पालव यांनी रिल्स मालवणीच्या सर्व शिलेदारांसह दणदणीत गाऱ्हाणे घातल्यानंतर अवॉर्ड शो ला सुरुवात झाली. विविध कॅटेगिरीतली अवॉर्ड्स यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यामध्ये सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक स्त्री – कोकणी बायलमाणूस निशा आजगावकर, सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक पुरुष – अमोल सावंत, सर्वोत्कृष्ट मालवणी गीत – याद तेची येता दादा मडकईकर आणि विजय गवंडे, सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका – पोर्ट्रेट – जेजे आर्ट स्कूल, सर्वोत्कृष्ट मालवणी नाटक – खेळो – पची प्रोडक्शन, सर्वोत्कृष्ट मालवणी कुटुंब – कलर्स ऑफ कोकण, सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार – राजीव सदाशिव हरियाण, सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार- कोकणकन्या सावी – सावी मुद्राळे, सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्य संस्कृती – खावचे गोष्टी -निशा केळुसकर, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री -श्रद्धा खानोलकर, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता – मुकेश जाधव, आणि दशावतार वर आधारित सर्वोत्कृष्ट मालवणी रील -ऋत्विक धुरी ,आकाश सकपाळ याना मान्यवरांच्या हस्ते हि अवॉर्ड वितरित करण्यात आली.
यावेळी विविध नृत्य कलाकारांनी नृत्य सादर केली तसेच नेरुरच्या कलाकारांनी रॉम्बॅट सादर केले. निलेश गुरव, बदल चौधरी आणि रुचिता शिर्के यांनी मालवणीतून केलेल्या निवेदनाने कार्यक्रमाची रंगात अधिकच वाढली. बादल चौधरी यांनी प्रेक्षकांसाठी विविध प्रश्न विचारून त्यांना प्रायोजित बक्षिसे सुद्धा देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळयाला तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी रिल्स मालवणीचे तुषार तळकटकर, विठ्ठल तळवलकर, तेजस मसके, रुचिता शिर्के, रामचंद्र आईर, हर्षवर्धन जोशी, तुषार देवळी, शरावती शेट्टी, चांदणी कांबळी, किशोर नाईक, मनिष पाटकर, रोहन नेरुरकर, निलेश गुरव, परषुराम पुजारी, ओंकार मसके, गौरव पाटकर, साईराज नाईक, विश्वजीत पालव, सचिन कोंडस्कर, अमर प्रभु, उपेंद्र पवार, भावेश तळवलकर, रामचंद्र राणे, किरण मेस्त्री, पुजा सावंत, वैभव सावंत, विवेक पालकर, सचिन तळवलकर, आशीष करंगुटकर, अभिषेक पवार, आरव आईर, कैलास पालव, रोशन चव्हाण आदी सदस्य उपस्थित होते.













