मथुरा: आजकाल तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की आपण सोशल मीडियाचा वापर करून अनेक गोष्टी शिकतो.काही वेळा सोशल मात्र सोशल मिडियावरील कुठल्या गोष्टी शिकाव्यात तसेच कुठल्या गोष्टींचं अनुकरण करावे याच तारतम्य आपण सर्वांनीच बाळगणे खूप महत्वाचे आहे.सद्ध्या एक वृत्त बरेच चर्चेत आहे एका ३२ वर्षीय युवकाने पोट दुखते म्हणून युट्यूब वर बघून स्वतःच्याच पोटाची शस्त्रक्रिया केली आणि त्यात त्याची प्रकृती अजून बिघडली आहे.हा प्रकार मथुरा येथे घडला असून पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका ३२वर्षीय तरुणाने यूट्यूब पाहून ऑपरेशनची पद्धत शिकली, इंटरनेटवर भूल देण्याच्या इंजेक्शनबद्दल वाचले आणि स्वतःवर स्वतःच शस्त्रक्रिया करण्याचा अघोरी प्रयत्न करत सर्वांनाच आश्चर्याचा जबरदस्त धक्का दिला. मात्र याचा काहीही उपयोग न होता त्याच्या वेदनांत आणखी भरच पडली आणि त्यानंतर त्याला तातडीने इस्पितळात दाखल करावे लागले आहे.
काय आहे सविस्तर वृत्तांत?
राजाबाबू असे या तरुणाचे नाव असून, वृंदावनच्या सुनरख गावातील तो रहिवासी आहे. त्याने बीबीएचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो शेती करतो.या तरुणाने स्वतःच्या पोटातील दुखणाऱ्या ठिकाणी ब्लेडने ७ सेंमीचा चिरा दिला; मग त्यात हात घालून पाहिले. पण, जेव्हा काहीच समजले नाही तेव्हा त्याने सुई आणि धाग्याने ते स्वतः शिवले; पण काही तासांनी त्याची तब्येत बिघडू लागली, म्हणून त्याने हे त्याच्या पुतण्याला सांगितले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या मेडिकल स्टोअरमधून इंजेक्शन, सर्जिकल ब्लेड आणि औषधे आणत त्याने केलेला हा प्रकार वैद्यकीय क्षेत्रासाठी धक्कादायक ठरला. पुतण्याने त्याला कम्बाईड हॉस्पिटलमध्ये नेले. जेव्हा संपूर्ण प्रकरण डॉक्टरांना सांगितले, तेव्हा डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. तो म्हणाला, १८ वर्षांपूर्वी माझे अपेंडिक्स ऑपरेशन झाले होते; पण गेल्या काही दिवसांपासून मला पुन्हा पोटात दुखू लागले. मी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला; पण आराम मिळाला नाही. मंगळवारी रात्री वेदना अधिक तीव्र झाल्या. यानंतर मी यूट्यूबवर ऑपरेशनचे व्हिडीओ पाहिले, प्रथम एक इंजेक्शन घेतले, नंतर जिथे वेदना होत होत्या ती जागा ब्लेडने कापली. यानंतर, जेव्हा मला काहीही समजले तेव्हा मी सुई आणि धाग्याने माझे पोट शिवले. नंतर, जेव्हा कुटुंबीयांना कळवले, तेव्हा त्यांनी रुग्णालयात नेले.













