दोडामार्ग: कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येते ती कोकणातील विलोभनीय निसर्गकिमया.कोकण म्हणजेच निसर्गाच्या वैविध्यांचे माहेरघर असेच एक विलोभनीय सौंदर्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील केर गावात सापडले आहे.कीटकभक्षी असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजातीतील ‘ड्रोसेरा बर्मानी’ ही कीटकभक्षी (मांसाहारी) वनस्पती आढळली आहे. त्यामुळे येथील जैवविविधतेचे वैभव अधोरेखित झाले आहे. निसर्ग अभ्यासक तुषार देसाई हे पक्षी निरीक्षणासाठी फिरत असताना या दुर्मीळ वनस्पतीचे दर्शन त्यांना झाले.दुर्मिळ ‘ड्रोसेरा बर्मानी’ कीटकभक्षी वनस्पतीचा उपयोग हर्बल औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. वनस्पती स्वतःचे अन्न हरितद्रव्याच्या सहाय्याने तयार करतात. परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि ते अन्न काही वनस्पतींना कीटक वा अन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते.अशा किटकभक्षी वनस्पतींच्या सुमारे 625 जाती असून. त्यांपैकी 30-35 जातींच्या वनस्पती भारतात सापडतात. महाराष्ट्रात फक्त पाच-सहा जातींच्या वनस्पती आढळतात.

या सर्व वनस्पतींना ‘मांसाहारी वनस्पती असेही म्हणतात.या वनस्पती जमिनीवर, पाण्यात किंवा दोन्ही ठिकाणी आढळणाऱ्या असतात. परंतु बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागांत आढळतात. ज्या ठिकाणी थोडाच नायट्रोजन असतो, तेथे त्या वनस्पतींची विशिष्ट प्रकारे वाढ होते.महाराष्ट्रात सापडणाऱ्या कीटकभक्षक वनस्पतींमध्ये ड्रोसेरा प्रजातीतील वनस्पतींच्या दोन प्रजाती उपलब्ध आहेत. ड्रोसेरा इंडिका आणि ड्रोसेरा बर्मानी. तिसरी जात ड्रोसेरा पेल्टेटा ही महाराष्ट्राबाहेर काही थंड हवेच्या ठिकाणी सापडते. ड्रोसेरा इंडिका ही पश्चिम घाटात खंडाळा, महाबळेश्वर आदी भागांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाहावयास मिळते. ड्रोसेरा बर्मानी ही दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस व भात शेतात पावसाळ्यानंतर सापडते.













