महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
रस्त्यांचे नंबरींग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
मुंबईः शीव-पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यातील सर्वच शीव-पाणंद आणि शेत रस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे पूर्ण करा अशी सूचना प्रशासनाला देतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेत रस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
काय म्हणाले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे?
बावनकुळे म्हणाले की. नागपूर जिल्ह्यात प्रति किलोमीटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनविण्यात आले आहेत. या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा.रस्त्यांचे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी. पाणंद रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत. पाणंद रस्ते, शेत रस्ते, सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलिस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल असे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले अशा रस्त्यांच्या नंबरींगचे सर्वेक्षण करून नंबरींग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.













