शब्दांकन – सायली राजन सामंत,नेरुर कुडाळ.बी. ए. एल.एल.बी स्टुडन्ट✒️
विद्वानांनी चंदनाला आणि चंद्रमाला शीतल मानल आहे. पण त्याहीपेक्षा शीतल असत मैत्रीचं नातं. फक्त ती शीतलता प्रासांगिकतेने ओतप्रोत भरलेली असावी लागते.अशी मैत्री ज्या माणसाला जीवनात अनुभवता आली त्या व्यक्तीच जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होत.हे त्रिवार सत्य आहे.
जीवनरूपी रंगमंच्यावर माणूस म्हणून कार्यरत असताना माझे बाबा नेहमी मला सांगतात सायली एखाद्या लग्नाची पंगत चुकली तरी चालेल पण संगत कधीही चुकू देऊ नकोस कारण कौरावांना दुराचारी शकूनीची संगत लाभली त्यांच्या कर्तृत्वाची राख झाली. साध्या पानाच्या टपरीलासुद्धा कौरावांच्या भावंडातील कोणाचच नाव दिल जात नाही हे सत्य आहे पण पांडवांना भगवान गोपाल कृष्णाची संगत लाभली आणि त्यांची संपूर्ण कारकिर्द सुखकर झाली म्हणूनच तर लाखो वर्ष होऊन गेली तरी पांडवांच्या कर्तबगारीचे पोवाडे आजही अभिमानाने गायले जातात. बाबांनी सांगितलेला हा वास्तव मला पदोपदी प्रेरणादायी ठरतो.म्हणूनच तर माझ्या संपर्कात एखादी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्या संवादात मतलबीपणा आहे का, धूर्तपणा आहे का, संधीसाधूपणा आहे का हे माझ्या पटकन लक्षात येत आणि मी त्याच्या हो ला हो नाही ला नाही असा मर्यादित संवाद साधत त्या व्यक्तीला शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करते.पण माझ्या संपर्कात आलेल्या व माझ्याशी संवाद साधणाऱ्या व्यक्तीच्या संवादात आर्तता असेल, निर्मळ आणि निरागसभाव असेल तर माझे आर्त मन मला सांगते की ही व्यक्ती मैत्री करण्याच्या योग्यतेची आहे.त्या क्षणाला माझे आणि समोरच्या व्यक्तीचे मित्रत्वाचे प्रेम आपुलकीचे स्वर जुळतात.प्रत्येक माणसाने दोस्तीच्या बाबतीत अशी सतर्कता राखणे गरजेजे आहे कारण आपल्याकडे जेव्हा धन, दौलत,संपत्ती, ऐश्वर्य असते तेव्हा आपला शत्रूसुद्धा स्वार्थासाठी आपल्याशी आपल्या मित्रासारखा वागत असतो हे त्रिवार सत्य आहे.दोस्तीच्या बाबतीत मी सांगू इच्छिते आयुष्यात मित्र असावे श्रीकृष्णासारखे जे तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी होण्यासाठी प्रत्येकवेळी मदत करणारे आणि मित्र असावेत शिवा काशीद सारखे प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःच्या प्राणाची आहुती देत लाखांचा पोशिंदा असणाऱ्या शिवाजी राजांना पेटाऱ्यातून पसार होण्यासाठी मदत करणारे.कारण मैत्री हे जगातले अविस्मरणीय नाते आहे. ज्या नात्याला स्वार्थाची परिसिमा नसावी.मित्रहो रक्ताची नाती ही तुम्हा आम्हाला जन्माने मिळत असतात पण मानलेली नाती ही मनाने जुळतात, पण कोणतही नातं नसतानाही जी बंधने जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री असे म्हणतात.मी एकदा कृष्णकथा वाचत असताना मला मैत्री या विषयावर एक सुंदर संवाद वाचायला मिळाला,त्या संवादात कृष्णाला मित्र सुदामाने विचारले की मेरे दोस्त तुम मुझे बतादो दोस्ती का असली मतलब क्या होता है?.. उस सवाल का जवाब देते हुए श्रीकृष्णने दोस्त सुदामाको हसकर कहा की जहा मतलब होता है वहापर दोस्ती कहा होती है?..लेकीन जिसके आचरण में सुदामा तेरे जैसी प्रासंगिकता होती है उससे दोस्ती बन जाती है.कृष्णाच्या मुखातून निघालेली वागेश्वरी सत्य सांगून जाते.म्हणूनच तर निःस्वार्थ स्वरूपाच्या दोस्तीचे दाखले पुराण कथासारात वाचायला मिळतात,पण सध्याच्या कलियुगात मैत्रीचे चित्रच मात्र पूर्णतः पलटलेले दिसते.कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यांच्या विस्तृत महासागरात मैत्री नावाचं सुंदर गलबत भरकटलेलं दिसत कारण फेसबुकला फ्रेंडरिक्वेस्ट,आणि इन्स्टाला फॉलोवर्स वाढावे म्हणून मैत्री करायच सध्या फ्याडं सुरु झाल आहे. यामुळे भरपूर अनुचित प्रकार घडताना दिसतात त्यामुळे शुद्ध मैत्रीची व्याख्या कंसात राहिली आहे. एकमेकांना इन्स्टा फेसबुकला मेन्शन करण म्हणजे घट्ट मैत्री होते का हो? माझ मत अस नाही की जगातली सगळी मैत्री या कॅट्यागिरी मध्ये मोडते पण 50% मैत्री ही सोशल मीडियाच्या मायाजालात फसलेली दिसते. म्हणूनच तर माणूस भावनिकदृष्ट्या विचार करायचा पुरता विसरून गेलेला आहे. एक मित्र गेला तर सोशल मीडियाला दुसरा मित्र मिळेल अशी सध्याच्या लोकांची मेंट्यालिटी झालेली आहे.अशा मेंट्यालीटीच्या लोकांना खऱ्या मैत्रीची व्याख्या कधीच समजणार नाही. सोशल मीडियावर जरूर मैत्री करा पण ती काल्पनिक मैत्री प्रसंगात तुम्हाला कितपत साथ देईल याचा अगोदर विचार करा कारण मित्रांनो सोशल मीडिया वर जे सूर जुळतात आणि प्रत्यक्ष भेटून संवाद साधून जे सूर जुळतात त्याच्यात जमीन आस्मानाचा फरक असतो.कारण माणसाच्या परिचयाची सुरवात सध्याच्या घडीला फेसबुकच्या चेहऱ्याने होत असली तरी त्या व्यक्तीची संपूर्ण ओळख प्रत्यक्ष भेटल्या नंतर त्याच्या वाणी,विचार आणि कर्मानेच होत असते.पुस्तकाच पान उलटून तुम्हाला कथा समजेलही पण दोस्ती समजायला त्या व्यक्तीची व्यथा वाचता आली पाहिजे.
मित्रांनो तुमच्या आयुष्यातील जुन्या मित्रांसोबतचे तुमचे मैत्रीचे नाते तुम्ही जरूर टिकवावेत आणि काळानुसार नवीन मित्रसुद्धा तुम्ही नक्की बनवावेत. कारण जुन्या आणि नवीन मित्रांमध्ये फरक फक्त एवढाच असतो की नव्या मित्रांना तुमची जगाच्या सारिपाटा वरील भूमिकाच माहिती असते पण जुन्या मित्रांना मात्र त्या भूमिकेमागील तुमचा खडतर इतिहाससुद्धा माहिती असतो.म्हणून सांगू इच्छिते मैत्री ही संभाजी महाराजांसारखी आणि कवी कलशांसारखी असावी मरणाच्या भागीदारीत सुद्धा हिस्सा मागणारी.मैत्री ही तानाजी मालुसरे सारखी असावी लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र जिवंत राहिला पाहिजे अस सांगत दोस्ती खातर प्राणांची आहुती देणारी, मैत्री ही कृष्ण सुदाम्या सारखी असावी मूठभर पोह्यातून अमृताची गोडी चाखणारी थोडक्यात सांगायच झालं तर मित्राची परिस्थिती गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचे नसते तर आपण मानलेला मित्र आपल्या अडचणीच्या काळात आपल्या पाठीशी किती खंबीरपणे उभा रहातो हे फार महत्वाचे आहे. कारण प्रसंगाच्या वेळी पाठीला पाय लावून पळणारे मित्र मी गल्लीबोळात पाहिले आहेत.माझा अनुभव सांगतो की प्रेम नावाची व्याख्या ही दिसायला नक्कीच सुंदर आहे जे प्रेम आपल्या हृदयाची काळजी घेते पण प्रेमापेक्षा मैत्रीची व्याख्या ही अतिसुंदर आहे म्हणूनच ती मैत्री नावाची व्याख्या मित्राच्या हृदयाची काळजी घेत असते.आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लोव्ह बॅटरी दाखवते ना आणि नातेवाईक नावाचा चार्जर जेव्हा हवा तेव्हा मिळत नाही ना तेव्हा पॉवरबँक बनून जे तुम्हाला मनापासून सहकार्य करतात ते आपले खरे मित्र असतात.म्हणूनच तर सांगू इच्छिते खोट्या नाट्याची पारख करता आली पाहिजे.नाहीतर जीवनाचा ऱ्हास हा ठरलेलाच आहे.मित्र हा सुखदुःखात साथ देणारा क्लासमेट असावा पण दारूच्या पार्टीतील ग्लासमेट नसावा.वास्तववादी उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या दूध विकणाऱ्या माणसा बरोबर दारूचा ग्लास घेऊन बसलात तरी समोरच्या बघणाऱ्या लोकांना वाटतं की तुम्ही दूध पीत बसला आहात पण नाण्याची दुसरी बाजू, एखाद्या वेळी तुम्ही बियर बार मध्ये शीतपेयाचा ग्लास घेऊन मित्रांच्या ग्यांग मध्ये बसला असाल तर समोरचे बघणारे तुम्हाला अस्सल बेवडा म्हणूनच ओळखणार.आपली संगत ही महत्वाची आहे ती कोणाशी करावी हे ज्याच्या त्याच्या हातात असतं. कारण पावसाचा एक थेंब जर गवतावर पडला तर त्याचा दवबिंदू होतो, तोच थेंब जर तव्यावर पडला तर त्याची क्षणार्धात वाफ होते, तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर त्या थेंबाचा मोती होतो हा निसर्गाचा नियम आहे.थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे पावसाचा थेंब हा थेंबच असतो तसा माणूस हा माणूसच असतो.महारथी कर्ण हा माणूस म्हणूनच जन्माला आला होता पण दुर्योधन हा संधीसाधू,दुराचारी आहे हे ठाऊक असताना सुद्धा कर्णाने त्याचाशी मैत्री केली त्यामुळेच त्याचं संपूर्ण जीवन आणि त्याच्या संपूर्ण विद्वत्तेची राख रांगोळी झाली.तसाच कर्णा सारखा अर्जुन हा सुद्धा माणूस म्हणूनच जन्माला आला होता पण त्याने प्रसंगाला धावून येणाऱ्या आणी तारणहार बनणाऱ्या भगवान गोपालकृष्णाशी घट्ट मैत्री केली म्हणूनच तर अर्जुनासहित त्याच्या चारही भावांच जीवन सुखकर झाल. आज पाच पांडवांच्या लौकिकाची थोरवी कीर्तनातून प्रवचनातून गायली जाते. ते खऱ्या आणि प्रासांगिक मैत्रीच प्रतिकच म्हणाव लागेल.













