आपल्या स्पष्ट वक्तव्यांनी कायम चर्चेत असणारे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते भास्कर जाधवांनी पक्षाला घरचा आहेर दिला. चिपळूणमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी “शिवसेनेची आता जवळ जवळ काँग्रेसच झाली आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत” असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी मांडले आहे. त्यांची बैठकीतील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याचे दिसत आहे.
चिपळूणमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भास्कर जाधव यांनी पक्षाच्या सध्याच्या कार्यपध्दतीवर अनेक आरोप केले आहेत.यावेळी बोलताना, “जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं” असा आरोपही यावेळी भास्कर जाधव यांनी केला. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी मंचावर सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम हेदेखील उपस्थित होते.


Subscribe







