राजापूर : येथील स्वरांजली कराओके ग्रुप राजापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत ‘रत्नसिंधु कराओके’ गायन स्पर्धेत कणकवली येथील रूपेश कल्याणकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
शहरातील पाटील मळा येथील यशोदिन सृष्टी येथे पार पडलेल्या या स्पर्धेचा शुभारंभ राजापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मालपेकर, विनायक सावंत यांच्या उपस्थित करण्यात आला. या स्पर्धेत 53 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची प्राथमिक फेरी मराठी गीतांची झाली, या फेरीतून 25 स्पर्धकांची अंतीम म्हणजे हिंदी गीतांच्या फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धकांनी जुनी, नवीन हिंदी व मराठी गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. स्पर्धेत रूपेश कल्याणकर (कणकवली) प्रथम, दिपांजली धावडे (मंडणगड) द्वितीय तर किशोर पवार (रत्नागिरी) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला, तसेच स्वरा यादव (चिपळूण), आदीती घागरे (राजापूर), राजदिप मुरबारकर व दिप्ती अभ्यंकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे, विनायक सावंत, सुबोध पवार, संदेश टिळेकर, गिरीष विचारे आदी उपस्थित होते. तर या स्पर्धेचे परीक्षण संगीत विशारद तेजस पवार, संगीत विशारद सौ.प्रियांका वेलणकर यांनी केले. या स्पर्धेसाठी ॲड . जमीर खलिफे, संदीप मालपेकर, तेजस कुशे, विनायक सावंत, श्रृती ताम्हणकर, संदेश टिळेकर, अविनाश पाटणकर, सुबोध पवार यांचे सहकार्य लाभले. या कार्यकमामध्ये जयश्री सुतार व चैत्राली कातकर यांनी बहारदार लावणी नृत्य सादर करत रंगत आणली, तर संदीप देसाई यांनी गाण सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये सौ.माधवी पाटील व सौ.शामला कुलकर्णी यांना नेत्रा कलेक्शन पुरस्कृत पैठणीचा मान मिळाला. तसेच यावेळी कुडाळ येथे झालेल्या कराओके स्पर्धेत प्रथम व द्वितीय कमांक पटकाविणाऱया संदीप देसाई व समीर पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रफुल्ल दिवटे, संदीप देसाई, संदीप पवार, समीर पेडणेकर, निकेत ओगले, समीर देशपांडे, साई अमरे, दिपीका पवार, महेश कुबडे, हर्षाली निकम, रसिका वायंगणकर, प्राची नाचणेकर यांनी मेहनत घेतली.













